अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
शहरातील किरण उद्धव जगताप याच्या हत्याप्रकरणातील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी मंगळवारी शहरातील कापड बाजारात अटक केली.
शेख अब्दुल रौफ हसन सहाब ऊर्फ बाबा जहागीरदार (वय- ६२ रा. जुना बाजार, भिस्तगल्ली), सर्फराज कदीर कुरेशी (वय- २९ रा. झेंडीगेट) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
२९ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी नगरमधील बाबा जहागीरदार व किरण जगताप हे दोघे पुण्याला जाण्यासाठी एसटी बसचे तिकीट काढण्यासाठी पुणे बसस्थानकामध्ये रांगेत उभे होते. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाले. त्यातून जहागीरदार याने आपली दोन मुले व इतरांना फोन करून बोलवून घेतले. या सर्वांनी मिळून किरण जगतापला लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी पसार झाले. महिनाभराच्या उपचारानंतर जगताप याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करत जहागीरदार याची दोन मुले व अमन बागवान यांना अटक होती. या खून प्रकरणी बाबा जहागीरदार, सर्फराज कुरेशी पसार होते. जहागीरदार व कुरेशी हे दोघे मंगळवारी कापड बाजारात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती.
त्यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांना आरोपी अटक करण्याच्या सुचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कापड बाजारात सापळा लावून आरोपींना अटक केली.