Saturday, May 4, 2024
Homeनगर‘हा’ विरोधकांचा बालिशपणा

‘हा’ विरोधकांचा बालिशपणा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चार वर्षात विकास नव्हता तर आज आंदोलन करणारे चार वर्षे झोपले होते का? श्रीरामपूरचा विकास मेला नसून नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने

- Advertisement -

अतृप्त आत्मे जिवंत झाले आहेत, म्हणून पालिकेसमोर चौथे पुण्यस्मरण साजरे करण्याचा बालिशपणा विरोधी नगरसेवक करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब गांगड, नगरसेवक रवी पाटील आणि रईस जहागिरदार यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शहराच्या रस्त्यांच्या दुर्दशेबाबत खापर नगराध्यक्षांवर फोडणारे भुयारी गटार गावात आणून रस्त्याचे घोटाळे कोणी केले, भुयारीत मलिदा कोणी खाल्ला, भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जामीन का मिळत नाही.

याबाबत ब्र शब्द काढत नाहीत. मुख्याधिकारी बदल्यांबाबत जे पोपटपंची करत आहेत त्यांना माहित आहे. मुख्याधिकार्‍यांच्या दालनाचा ताबा कोणी घेतला होता? मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीवर कोण बसायचे. मुख्याधिकार्यांना कोणी त्रास दिला. तेव्हा आज आरोप करत आहे हे हास्यास्पद आहे, असा टोला गांगड, पाटील, जहागिरदार यांनी लगावला.

गेल्या 4 वर्षात शहरातील एकाही व्यापार्‍याला त्रास झाला नाही. कोणाचे भूखंड लाटले नाही, हा फरक सर्वांना दिसतोय. जे विकासाच्या गप्पा मारत आहेत त्यांनी 25 वर्ष फक्त स्वतःचा आणि बगलबच्च्यांचा विकास केला हे जनता ओळखून आहे. आदिक, टेकावडे, मुरकुटे यांनी केलेल्या विकासाचे श्रेय घ्यायचे आणि पाठ थोपटून घ्यायची एवढाच विकास मागील सत्ताधार्‍यांना जमला. गेल्या 4 वर्षात ज्यांच्या अनधिकृत इमारती पडल्या, अनधिकृत बांधकामे थांबली असेच अतृप्त आत्मे आज टिका करत आहेत.

स्वतःचा विकास थांबला म्हणून आज विरोधक बोंबा मारत आहेत, नगराध्यक्षा भ्रष्टाचाराला साथ देत नाहीत हीच खरी विरोधकांची पोटदुखी आहे. नगराध्यक्षांचा पारदर्शक कारभार विरोधकांना कदाचित आवडत नसावा, असे गांगड, पाटील, जहागिरदार यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या