Friday, May 3, 2024
Homeनाशिकमंत्री अदिती तटकरेंकडून प्रबोधिनीच्या खेळाडूंचे कौतुक

मंत्री अदिती तटकरेंकडून प्रबोधिनीच्या खेळाडूंचे कौतुक

नाशिक । Nashik

नाशिक जिल्हा खो-खो संघटने तर्फे गेल्या ३ वर्षांपासून आदिवासी खेळाडूंसाठी भारतातील पहिली निवासी खो-खो प्रबोधिनी चालविण्यात येत आहे. या प्रबोधिनीत ३६ मुली व १६ मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय हितचिंतक व स्नेही जनांकडून या प्रबोधिनीचा खर्च करण्यात येत आहे. नाशिक जिल्हा खो-खो संघटनेने आज नाशिक येथे राज्य क्रीडामंत्री अदितीताई तटकरे यांची भेट घेऊन आपल्या कार्याची माहिती दिली.

या प्रबोधिनीला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे अनिवासी खो-खो प्रबोधिनी म्हणून मान्यता देण्यात यावी अश्या आशयाचे पत्र त्यांना देण्यात आले . या प्रसंगी सध्याच्या करोनाच्या वातावरणात या मुलींना नाशकात आणून त्यांच्या ऑफ लाईन शिक्षणाची सोया केल्याबद्दल संघटनेचे राज्य क्रीडामंत्री अदितीताई तटकरे यांनी विशेष कौतुक केले.

या प्रबोधिनीला शासकीय स्तरावरून योग्य ती मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. मुलींसाठी बनवलेल्या विशेष सुरक्षा किटची त्यांनी आस्थेने चौकशी केली. पुढील भेटीत तुम्हा सर्वांना तुमच्या प्रबोधिनीत भेटायला येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रबोधिनीत पहिली १० वी ची परीक्षा देऊन ८०% गुण मिळवणाऱ्या कौशल्या पवार व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खो-खो खेळाडू कु. निशा वैजल , सोनाली पवार व मनीषा पडेर यांचे विशेष कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या