Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमाघी एकादशी भाविकांशिवाय होणार साजरी

माघी एकादशी भाविकांशिवाय होणार साजरी

पंढरपूर l Pandharpur

माघी एकादशीचा मुख्य सोहळा २३ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून ३ ते ४ लाख वारकरी भाविकांची उपस्थिती असते. मात्र

- Advertisement -

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरची माघी यात्रा भाविकांशिवायच साजरी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील माघी वारी मात्र करोनाच्या संकटामुळे पहिल्यांदा चैत्र वारी रद्द झाली. त्यानंतर आषाढी, कार्तिकी वारी रद्द करावी लागली. आता माघीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री बारापर्यंत पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपुर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिराने पारित केले.

श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे मुखदर्शन दशमी म्हणजेच २२ आणि एकादशी म्हणजेच २३ फेब्रुवारी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीने यापूर्वीच घेतला आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे, शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने काढण्यात आले आहेत. तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. परंतु या प्रवासी सेवेतून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे तथा शहरात प्रवेश नसेल. ही सेवा केवळ तातडीची आपत्कालीन सेवा राहील. असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, या काळात देवाचे सर्व नित्योपचार व एकादशीची महापूजा करानाचे नियम पळून करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . यावेळी उपस्थित राहायची परवानगी दिलेल्या सर्वांची करोना चाचणी करावी लागणार आहे. यात्रा काळात वाहतूक व्यवस्था सुरू राहणार असली तरी एकही भाविकाला पंढरपूर मध्ये उतरता येणार नाही. माघी यात्रा काळात वासकर महाराज यांच्या भजन परंपरेला केवळ ६ लोकांना कोरोनाचा नियम पळून परवानगी तर औसेकर महाराज यांच्या चाकरी भजनाला १२ लोकांना नियम पाळून परवानगी दिली आहे. पुंडलिक रायच्या काल्याला २६ वारकरी व मानाकाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

करोनाच्या संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी चैत्री, सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे करोनामुळे रद्द झाले होते. वाईट आठवणींचे २०२० साल संपले आणि नवीन २०२१ सालात वारकरी संप्रदायाची येणारी पहिली यात्रा पुन्हा करोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या