Friday, May 3, 2024
Homeब्लॉगशिक्षणातून सकारात्मकतेकडे...

शिक्षणातून सकारात्मकतेकडे…

“आमच बाळ म्हणजे निव्वळ मूर्ख आहे. त्याला शिकविले तरी लक्षात राहात नाही. अगदी मठठ आहे. अगदीच ढ आहे” बाळाची आई सांगत होती. हे सांगितले जात असतांना त्या लहानशा बाळाच्या चेह-यावरील भाव तर पाहाण्यासारखे होते. लहान मुलांना कुठे काय कळते? असे म्हणून आपण त्याच्यावरती नकारात्मकतेचे टोमणे मारत असतो. मुलांना अशा स्वरूपाचे टोमणे मारणे घडत असेल तर शिकणे कसे होणार हा प्रश्न आहे. शिकण्यासाठी उपलब्ध सुविधेसोबत सकारात्मक प्रेरणा महत्वाची असते.

अलिकडे मुलांच्या शिक्षणांची चिंता मोठया प्रमाणावर वाहिली जाते आहे. बालकाला लिहिते, वाचते करण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न केले जातात. पण अटटहासाने लादून जे काही केले जाते त्यातून खरच शिकणे होते का? मुळात शिकण्यासाठी प्रेरणा नसेल तर होणारे शिकणे केवळ देखावा ठरण्याची शक्यता असते. मात्र जेव्हा शिकण्याची प्रेरणा असते तेव्हा होणारे शिकणे अधिक समृध्द होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर सातत्यांने कौतूकाच्या शब्दांची थाप पडायला हवी असते. मात्र कौतूक न करता केवळ नकारात्मक भावनेने सुरू असणा-या भाषेने आपण बालकांना शिक्षणापासून दूर नेत असतो.

- Advertisement -

शिकण्यासाठी खरच कशाची गरज आहे असा प्रश्न आपण विचारला तर शिक्षक हवेत, पुस्तक हवेत, शाळा हवी.. इतके सारे पुरेसे ठरणार आहे का? या पलिकडे शिकण्यासाठी प्रेरणा महत्वाची असते. वरील सर्व सुविधा पुरविल्या तरी शिकणे होत नाही. मात्र जेव्हा अंतरिक प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा काहीच नसले तरी शिकण्यासाठीची पाऊलवाट निर्माण केली जाते. कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता प्रत्येक बालकाच ठासून भरेलली असते. शिकविणे म्हणजे तरी काय असते? तर विद्यार्थ्यांसाठी फक्त आव्हाने निर्माण करणे असते. प्रश्न निर्माण केले की त्याच्या उत्तरासाठी विद्यार्थी पाठपुरावा करीत असतात. अनेकदा ते प्रयत्न वरवरचे राहात नाही.

सखोल प्रयत्नांचा शोध असतो. पण जेव्हा केवळ परीक्षा आणि शाळेपुरते शिकणे इतक्या मर्यादित अर्थांने शिकण्याचा प्रवास असतो तेव्हा पुस्तकातील चार पाच वाक्याचे उत्तर पुरेसे ठरते. त्यात ते उत्तरही जीवावरती आल्या सारखे लिहिले, सांगितले जात असते. मात्र प्रेरणेने शिकण्याचा प्रवास घडतो तेव्हा व्यापक अर्थाने शिकण्याची प्रेरणा जीवंत ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे घरात आणि शाळेत फक्त प्रेरणा देणारी वाक्य सतत कानी पडण्याची गरज आहे. शिकविणे याचा अर्थ स्पष्टीकरण, निवेदन असे काही नसते तर केवळ शिकण्यासाठीचे वातावरण निर्माण करणे असते. ते वातावरण जी माणंस निर्माण करू शकतात त्या माणंसानी नाही शिकविले तरी मुले शिकत असतात. मुळतः आपण शिकविले तरच मुले शिकतात हा समजच मुळात खोटा आहे. अनेकदा लादलेले न शिकणे हाच मुलांचा स्वभाव असतो. त्यांना ज्यात आनंद मिळतो ते शिकण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे शिकण्यासाठी त्यांच्या आवडीचे पक्त अध्ययन अनुभवाची रचना करता आली तरी शिकण्याचा प्रवास सुरू होतो.मात्र केवळ अनुभवाची रचना करून चालत नाही त्या करीता प्रेरणा ठासून भरायला हवी असते.

विद्यार्थ्यांना गृहित धरून वयाने मोठी झालेली माणंस मुलांच्या बाबतीतील निर्णय स्वतःच घेत असतात. शाळेत, घरात आणि समाजात त्यांना देखील गृहित धरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या गृहितकात त्यांना जणू काहीच कळत नाही असा भाव असतो. अनेकदा मुले लहान आहेत म्हणून त्यांना आदर मिळत नाही. त्यांना कोठे काय कळते असा भाव असल्यांने आपण आपलेच नुकसान करीत असतो. मुलांना जे कळत असते त्याचा विचार आपण करू शकत नाही. त्यांच्या मनात सतत काहींना काही सुरू असते. त्यांचे मनातील सुरू असणे आपण जाणून घेण्यात कमी पडत असतो. कदाचित ते जे विचार करत असतात तो विचार आपल्यासाठी टाकाऊ असू शकतो. त्यामुळे त्यांना समजाऊन घेणे महत्वाचे आहे.

शिकण्यासाठी लागणारी प्रेरणा मिळाली तर विद्यार्थी योग्यवेळी शिकू शकतात. आईन्स्टाईन तर वयाच्या 17 व्या वर्षी शिकू लागला होता. शालेय शिक्षणाच्या आरंभीच्या वयात ना त्याचे पुस्तकाशी नाते जुळले होते ना शिक्षकांशी. अगदी तो शिक्षकांच्या दृष्टीने शाळेत ढ विद्यार्थी होता. लहान वयातील शिक्षकांनी हा शिकू शकणार नाही असा शेरा देखील मारला होता. पण तरी सुध्दा वयाच्या सतराव्या वर्षी त्यांने घेतलेली झेप तोंडात बोट घालण्यास लावणारी होती. याचा अर्थ सतराव्या वर्षी शिकू लागला असे होत नाही. अगोदरच्या वर्षात त्याचे शिकणे सुरूच होते. त्याचे विचार करणे, प्रतिसाद देणे यातून भविष्य उभे राहिले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आय़ुष्यात असे घडत असते. मात्र ते जाणता येणे महत्वाचे आहे इतकेच. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांना प्रेरणा देणारे अय्यर गुरूजी आले आणि त्यांना वाट सापडली. त्या वाटेने जीवनभर ते चालत राहिले. अनेकदा शालेय वयात शिक्षकच प्रेरक हवे असतात. त्यांनी येनकेन प्रकारे प्रेरणा जागृत केली की विद्यार्थी त्याच वाटा धुंडाळत बसतात. जगप्रसिध्द वक्ता म्हणून ज्यांना अवघे जग ओळखते ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांना आपणास बोलता येते याचा शोधच मुळात चाळीसाव्या वर्षी लागला होता. त्यामुळे शिकणे म्हणजे स्वतःचा शोध असतो. तो शोध घेण्याची संधी निर्माण करून देण्याची गरज आहे. असा शोध लागण्यासाठी वातावरण हवे असते. ते वातावरण निर्माण करणे म्हणजे शिकविणे असते. शालेय जीवनात शिक्षक हे प्रेरक असतात. मात्र हळूहळू विद्यार्थी जसे शिकत जातात तसे तसे त्यांना वाचनाची आवड लागते आणि योग्य त्या वयात पुस्तके जीवनात प्रेरकाचे स्थान प्राप्त करतात. कलामांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कुरल पुस्तकाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. म्हणून जीवनात पुस्तकाचे स्थान काय असते तर ते जगण्यासाठी महत्वाची भूमिका घेत असतात. पुस्तके सर्वांसाठी प्रेरणादायीच असतात.

शाळेत अनेकदा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा घटक कितीही शिकविला तरी त्याला तो येतच नाही. म्हणून त्याला रागावणे, शिक्षा करणे, टोमणे मारणे, टाकून बोलणे या प्रकारच्या शिक्षा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष होत असतात. मात्र या शिक्षांमुळे मुलांच्या आयुष्यात किती बदल होतो हा प्रश्न आहे. अभ्यासकांच्या मते या सारख्या शिक्षा मुलांचे आय़ुष्य अधिक नकारात्मक बनवितात. त्यांच्या मनातील प्रेरणेचे भाव संपुष्टात आणतात. शिकण्याची, प्रगतीचे भाव निर्माण करण्याऐवजी आपल्याला हे येत नाही. आपण असेच आहोत या स्विकृतीच्या भावनेकडे आकर्षित होतात. इतक्या लहानवयात मुलाची उमेद संपुष्टात येण्याचा प्रवास सुरू होतो. एका वर्गात एका विद्यार्थ्याला खुपदा गणित येतच नव्हते. सर्व गणित नेहमी चुकायचे. शिक्षक वैतागले त्यांनी अखेर त्याचे गणित पाहाणेच सोडून दिले. आता शिक्षकच गणित पाहात नाही म्हटल्यावर प्रयत्न करण्याची उमेदच नष्ट झाली. मग त्यांने गणित शिकवितांना जे काही थोडयाफार प्रमाणात लक्ष देत होता तेही थांबले. गणिताच्या शिक्षकांना आपण काही चूका करीत आहोत हे ही जाणवत नव्हते. असेच एकदा पुस्तक वाचता वाचता प्रबलन, कौतूक किती महत्वाचे असते हे वाचण्यात आले. त्यांनी प्रयोग करून पाहाण्याचे ठरविले. प्रयोगासाठी त्याच मुलाला निवडले.दुस-या दिवशी त्याला जवळ बोलविले, गप्पा मारल्या,पाठीवरून हात फिरविला. त्यालाही फार आनंद झाला.

शिक्षक आपल्याशी बोलता आहेत, कौतूक करता आहेत पाहिल्यावर तो लक्ष पूर्वक शिक्षकांच्या शिकविण्याकडे लक्ष देऊ लागला. मात्र तरी गणित काही जमेना. शिक्षकांना दोन गणिते दिली आमि दोन्ही चूकली तरी एक बरोबर आणि एक चूक असे सांगू लागली. जे चुकले ते बरोबर कसे करायचे ते पुन्हा पुन्हा सांगू लागले. प्रत्येक वेळी येईल तुला. जमतेय तुला.. एक बरोबर आले ना.. मग दुसरे पण बरोबर येईल असा विश्वास देऊ लागले. मुलाला हळूहळू स्वतःवरती विश्वास बसू लागला. स्वतःवरचा विश्वास उंचावला. त्यातून प्रेरणा जागृत झाली. अनेक वर्ष प्रयत्न करून त्याला गणित येत नव्हते मात्र आता त्याला काही दिवसात गणित जमू लागले होते. तो आता गणित वेगाने आणि अचूक करू लागला होता. शिक्षक तेच होते, पुस्तके तेच होते, वर्गही तोच होता. बदलली होती फक्त शिक्षकाची दृष्टी आणि विद्यार्थ्यांची प्रेरणा. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपणाला पुढे घेऊन जायचे असेल तर त्याला सतत उर्जा मिळेल असे बोलत राहायला हवे. उणिवाची जाणीव इतक्या सहजतेने करून द्यायला हवी की त्यांची सकारात्मक प्रेरणा मरणार नाही.

इतराशी तुलना करणे टाळायला हवे. प्रत्येक मुल अव्दितीय असते. त्याच्या अंगी असलेल्या वेगळ्या क्षमता आपण ओळखू शकत नसू, पण त्या क्षमताना वाट मिळाली तर तो आपल्या जीवन प्रवासात अव्दितीय ठसा उमटू शकतो. स्टिव्ह ज़ॉब यांच्या जीवन प्रवास समजून घेतांना हा शिक्षणाने नाकारलेला विद्यार्थी जीवनात मात्र यशाच्या शिखरावर पोहचला. अशी शिक्षण व्यवस्थेने अनेक नाकारलेलेली शेकडो विद्यार्थी प्रेरणे अभावी वाटा चुकलेले दिसतात. मात्र शिक्षणात प्रेरणा नाही म्हणून ते बाहेर पडतात आणि अंतरिक प्रेरणेने कार्यरत राहातात. त्यांच्या त्या प्रकाशवाटेने अनेकाचे आयुष्य बदलते. त्यामुळे पालक आणि शिक्षक म्हणून सतत सकारात्मकतेने संवाद व्हायला हवा.. मोठयांनी जरी ही वाट आपल्या जीवनात चोखाळली तरी जीवनातील संघर्ष आणि तणावापासून मुक्ती मिळाल्या शिवाय राहाणार नाही. मात्र सकारात्मकता म्हणजे वास्तावाकडे डोळेझाक करणे नाही आणि लांगूनचालन करणे तर मुळीच नाही हेही लक्षात ठेवायला हवे. योग्यवेळी योग्य त्या शब्दात सुनावते येणे महत्वाचे आहे.. पण त्यासाठी शब्द आणि वेळ अचूक असायला हवी इतकेच.

- Advertisment -

ताज्या बातम्या