Friday, May 3, 2024
Homeब्लॉगविचार नको.. प्रेम हवे..

विचार नको.. प्रेम हवे..

मुलं काही केल्या शिकत नाही, आमचे प्रयत्न कमी पडता आहेत की काय असे वाटते. पाण्यासारखा पैसे खर्च केलेत पण काही उपयोग झाला नाही. असे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. आम्ही इतका खर्च केला, उत्तम शाळा निवडली. शाळा अत्यंत उपक्रमशील होती. शिक्षक चांगले होते पण तरी मुलं काही शिकले नाही.

आमची स्वप्न होती.. ती पूर्ण होतील अशी अपेक्षा होती पण काही झाले नाही. आमचाच पराभव झाला ही भावना अनेकदा पालक व्यक्त करत असतात. तेव्हा या भावनेत खरच कोण चुकते..? मुलांना आपल्या जबाबदा-या कळत नाही की पालक मुलांवर काही लादतात म्हणून त्यांना शिक्षण नको आहे. मुलं शिकावे असे वाटत असेल तर मुलांवर स्वप्न लादायला नकोत. तर त्यांना गरज आहे फक्त प्रेमाची.. जिथे प्रेम ओतप्रोत भरून मिळते तेथे शिक्षणाचा प्रवास सुरू होतो.. केवळ पैसा ओतून अन उत्तम भौतिक सुविधांनी युक्त शाळा निवडून आपल्याला फार काही शिक्षण सुरू ठेवता येत नाही.शिक्षणाचा प्रवास तर तेव्हा सुरू होतो जेव्हा मुल प्रेमात डुंबत असते.

- Advertisement -

आपल्याकडे समाज व्यवस्थेत साधारण आपल्या मुलांने काय शिकावे? कोठे शिकावे? काय बनावे? या सर्व मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या गोष्टी पालकांनी निश्चित केलेल्या असतात. यात मुलांना काही एक करण्याचे स्वातंत्र्य नसते. शिक्षण खरेतर मुलांचे होत असते पण शिक्षणासंबधीचे निवडीचे अधिकारी मुलाला असत नाही. त्याबाबत सर्व निर्णय पालक घेत असतात. अगदी मुलांने काय व्हावे हे सुध्दा पालकच ठरवितात. त्यात त्या मुलांचा बुध्दयांक, अभिरूची, कल या गोष्टींनी काहीच स्थान असत नाही. पालक डॉक्टर असतील तर त्यांनी निर्माण केलेली भौतिक सुविधा लक्षात घेऊन मुलांने ड़ॉक्टर बनावे असे वाटत असते. आपल्यानंतर आपला व्यवसाय आपल्या मुलांने चालविला पाहिजे अशी धारणा असते. साधारण पणे प्रत्येक व्यावसायिकाची ही धारणा मनात घर करून असते. ती धारणा धरण्यात पालकांची भविष्यासाठीची निश्चित अपेक्षा असते. आपण एकप्रकारे त्यांच्यावरती आपले स्वप्न थोपवत असतो.

कधी कधी आपण शिकत असतांना आपल्याला काही बनायचे असते. आपलेही स्वतःचे काही स्वप्न असतात. ती स्वप्न मात्र परीस्थितीने पूर्ण करता आले नाहीत. अनेकदा आपल्याला ज्या दिशेने जायचे होते तो प्रवास अर्ध्यावरती सोडावा लागला. त्यामुळे आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याकरीता आपले अपत्याकडून अपेक्षा केल्या जातात. किंबहूना आपल्या स्वप्नपूर्तीचे साधन म्हणून बालकाकडे पाहिले जाते.म्हणजे स्वतःचे स्वप्न पूर्ण व्हावे या करीता बालक साधन ठरत असेल तर त्याच्यावरती मानसिक ओझे निर्माण होणार यात शंका नाही. मुलाला काय व्हायचे आहे हे महत्वाचे ठरत नाही, तर मला जे काही व्हायचे होते ते होता आले नाही. आता त्याकरीता तुला ती पदवी धारण करायला हवी. मला नाही तर तू तरी बनायला पाहिजे अशा अपेक्षांचे ओझे असते. त्या ओझ्यात आपली प्रतिष्ठा लपलेली असते. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही त्या करीता मुलांने आपले स्वप्न पूर्ण करायला हवे. अशा परीस्थितीत शिक्षणाचा विचार मागे पडतो आणि मुल म्हणजे स्वप्नपरीपूर्तीसाठी रेसचा घोडा बनते. या स्पर्धेत ना त्याचा आनंद असतो… ना आवड असते…. असते फक्त पालकांची इच्छा.

जेथे स्वतःचा आनंद नसतो तेथे शिकण्याचा प्रवास घडण्याची शक्यता अजिबात नसते. त्यामुळे मुलांना योग्य दिशेने वाढवायचे असेल तर त्याला आपले विचार देण्याची गरज नाही. आपले स्वप्न नको तर त्याला त्याची स्वप्न पाहूदे. खलिल जिब्रान म्हणत असे, की “तुम्ही आपल्या मुलांना प्रेम द्या मात्र आपले विचार देऊ नका” इतका महत्वाचा विचार आहे. मात्र अवतीभोवती घडतांना नेमके हेच घडते.पालक मुलांना विचार देतात आणि प्रेम द्यायचे राहून गेले असे घडते. खरेतर शाळेत येतांना बालक कोरेकरकरीत असते असे म्हणता पण ते काही खरे नसते. कारण ते बालक घरातून विचार, पंरपरा, संस्कृती, भाषा, संस्कार घेऊन य़ेत असते. त्यामुळे मुल कोरे नसतेच. एका अर्थांने मुलांवरती आपण जे लादतो त्यातून त्याचा शिक्षण प्रवास खंडीत होत असतो. त्यामुळे फक्त मुलांना प्रेम द्यायला हवे. प्रेमाचे नाते मुलांच्या भावविश्वाला अधिक समृध्द करीत असते. प्रेमाच्या धाग्याने विद्यार्थ्याला शिकण्याकरीता बळ मिळत असते. मुलाची घरात प्रेमाची भूक भागविली गेली तर मुलाची वाढ अधिक निकोप होण्यास मदत होत असते. त्या प्रेमातून मुल अधिक बंधनात अडकते. प्रेम हे स्वातंत्र्य नाही तर ते बंधन असते. त्या बंधनात स्विकृती असते. त्यामुळे मुल आपल्यावरती प्रेम करणा-या माणंसासाठी पाऊलवाट चालण्याचा निर्णय घेत असते. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय आवडतो असे म्हणतात. तो विषय काही त्याला शिक्षणांच्या आरंभापासून आवडत नाही. मात्र त्या विद्यार्थ्यावरती जे शिक्षक प्रेम करतात त्या शिक्षकांशी त्याचे एक नाते तयार होत असते. त्या नात्यातून एक बंध निर्माण होतो आणि त्या बंधनात विषयाची अभिरूची विकसित होत असते. त्यातून विद्यार्थ्याला विषय आवडायला सुरूवात होते. त्यामुळे शिकण्याकरीता मुलांना प्रेम हवे असते. ते घरातही हवे आणि शाळेतही. गुणवत्तेचा राजमार्ग हा प्रेमाच्या महाव्दारातून जात असतो.

अनेकदा मुले प्रेमात वाहात जातात. बेशिस्त वाढीस लागते असा एक आक्षेप नोंदविला जातो. पण ते काही खरे नाही. मुलाचे लाड करतांना त्यात प्रेम असतेच असे नाही. लाडात अतिरिक्त पैशाची विनिमय असतो. मात्र प्रेमात असलेल्या नात्यात मुलांवरती अप्रत्यक्ष बंधने येत असतात. त्यामुळे आपल्यावरती जी माणंस प्रेम करतात त्या नात्याचा पगडा असतो. ती व्यक्ती आपल्या वरती नाराज होऊ नये. या करीता ती मुले त्यांच्यासाठी कष्टत राहाण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रेम करणा-या माणंसाना जे हवे असते तो प्रवास करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेसाठी देखील घर आणि शाळेत प्रेम ओतप्रोत भरलेले असायला हवे. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रेम हे सर्वोत्तम औषध आहे. कोणतेही मुल प्रेमाशिवाय निकोप वाढू शकत नाही. प्रेमाकरीता आर्थिक परीस्थिती उत्तम हवी असते असे अजिबात नाही. परीस्थितीने आपण केवळ चांगले कपडे, खेळणी, खाऊ देऊ शकू पण प्रेम दिले जाईलच असे नाही. आपण मुलांना किती महागाचा वस्तू देतो याला फारसे मोल नसते. मुलांच्या दृष्टीने देखील त्याला किंमत नाही तर आपण त्यांचेवरती किती प्रेम करतो हे महत्वाचे असते. प्रेम करण्यासाठी परीस्थिती कधीच आड येत नाही. आपण जेव्हा मुलांवरती प्रेम करीत असतो तेव्हा त्याच्या स्विकारण्याची भावना असते. आपल्याला स्विकारले जात आहे ही भावना मुलांना प्रेरित करीत असते. प्रेम हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठऱते. त्यातून त्यांने केलेल्या चूका स्विकारल्या जातात. त्यांच्या चूका पोटात घालण्याची वृत्ती विकसित होत असते. त्याच्या प्रत्येक कृतीसाठी कौतूकाचे शब्द असतात. पाठीवर थाप असते. त्याच्या सोबत प्रत्यक्ष क्षण जगणे असते. हात उगारणे नसते. चिडणे नसते. राग नाही. मारहान तर बिलकूल गरज पडत नाही. भावना जोपासण्याचा प्रयत्न असतो. त्याचे सौंदर्य, रंग, उच्चार यापेक्षा महत्वाचे ठरते ते प्रेम. त्यामुळे त्याची स्विकृती होत असल्यांने मुल अधिक चांगले शिकू लागते हे सिध्द झाले आहे. मुलांच्या अपयशाचे भांडवल केले जात नाही. सचिन तेंडूलकर दहावी नापास झाले तेव्हा त्याचे पिताश्रींनी त्याच्या पाठीवर हात टाकत बॅट घेऊन मैदान गाठण्याचा आणि अधिक चांगले खेळण्याचा सल्ला दिला. त्या प्रेमात एक विश्वास होता. त्यामुळे मुलाला मिळालेल्या प्रेमात ते अपयश देखील पुसले गेले. पालकांनी अपयशाचा, मिळालेल्या मार्कांचा, टक्केवारीचा विचार सुध्दा केला नाही. तुलना तर अजिबात नाही.प्रत्येक मुल अव्दितीय असते. आपण ज्या काही अपेक्षा करतो त्या कदाचित त्यांच्याकडून पूर्ण होणार नाहीत, मात्र त्याच्यात असलेल्या सुप्त शक्तीतून ते ज्या वेगाने विकसित होते तो वेग केवळ पालकांच्या प्रेमाने घडते. त्यामुळे एरिकस यांनी म्हटले आहे की, बालपण हे मुलभूत विश्वासाचे आणि अविश्वाचे उगमस्थान आहे. त्यामुळे त्या वयात आपण किती प्रेमात डुंबून ठेवतो त्यानुसार बालकाची जडणघडण होत असते. त्याचा दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याची प्रगती हवी असेल, त्याला उत्तम नागरिक म्हणून घडवायचे असेल तर त्यांच्यावरती निंतात प्रेम करा… त्याच्यावरती प्रेमाचा मारा करा.. त्यातूनच बालक घडणार आहे आणि आपल्याला हवी असलेले स्वप्न देखील त्याच मार्गाने पूर्ण होणार आहे.. आपले मुले म्हणजे आपली प्रतिकृती नाही, तर ते स्वतंत्र्य बालक आहे. त्यामुळे त्याला आपण जे काही ठरविणार आहोत त्या दिशेचा प्रवास घडू नका.. अन्यथा उंच उंच वाढणारे झाडाचे बोन्साय होण्याचा धोका आहे. निसर्गात जे काही आहे ते मुक्तपणे व्यक्त होऊ दे.. त्याला वाढू दे… खेळू दे.. आणि विचार करू दे.. त्यातच समाज व कुटुंब व राष्ट्राचे भले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या