Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?; नाना पटोलेंचा सवाल

मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?; नाना पटोलेंचा सवाल

मुंबई | Mumbai

तौक्ते चक्रीवादळाने गुजरात महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. गुजरातमध्ये अनेक गावांना फटका बसला आहे. चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पाहणी दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी टोला लगावला आहे. त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, नारळ, आंब्याच्या बागांसह मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेत आहेत. पंचनाम्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरे करून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत आपण स्वतःही उद्या गुरुवारी कोकणाच्या दौ-यावर जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

लोकसभा निवडणूक घेण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे.

तसेच, ‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल,’ असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

करोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. १०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे तर डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी ११८५ रुपये होती ती आता १९०० रुपये केली आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ रुपयांऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला आहे. या पत्रकारपरिषदेला आ. विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे, देवानंद पवार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या