नाशिक | Nashik
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीचा नाशिक लोकसभेचा (Nashik Loksabha) उमेदवार ठरत नसल्याने महायुतीचे भिजते घोंगडे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले. त्यानंतर उद्या शुक्रवारी (दि. २६) रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र,तरीही महायुतीचा नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावा केल्याने हा तिढा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाशिकच्या (Nashik) जागेचा तिढा सुटणार तरी कधी? असा सवाल तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेवर सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला होता. या जागेवर विद्यमान खासदार आपल्या पक्षाचा असल्याने ती जागा आपल्याच पक्षाला मिळावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर राष्ट्र्वादी कॉंग्रस अजित पवार गटाचे हेवीवेट नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकची जागा आपल्या पक्षाला मिळावी असे म्हणत स्वत: निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.यानंतर भाजपनेही नाशिक लोकसभा मतदारसंघात आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने ही जागा आपल्या पक्षाला सोडावी, असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला. मात्र अद्यापही या जागेचा तिढा सुटलेला नसून येत्या दोन दिवसांत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभेची जागा भुजबळांसाठी सोडावी
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाशिक लोकसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. पंरतु, माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा नाशिकच्या जागेचा दावा कायम असल्याचे म्हटले होते. त्यानंतर समता परिषद आणि नाशकातील ओबीसी संघटनांनी भुजबळांची भेट घेत त्यांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी पुन्हा विचार करावा, असा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करून ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात यावी,अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार
तसेच आज झालेल्या बैठकीत नाशिक लोकसभेबाबत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली जाईल, असेही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक लोकसभा मतदारसंघ पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अनुकूल राजकीय स्थिती आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत शहरात मोठी विकासकामे झाली आहेत. या सगळ्यांचा मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. याशिवाय पक्षाने जर वेगळा उमेदवार दिल्यास तो पक्षाचा निर्णय समजून सर्वांना मान्य राहणार असून महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यासाठी काम करतील, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटले.