येवला | प्रतिनिधी
शहरातील अंबिया शाह कॉलनी परिसरात शनिवारी (दि. ७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. उस्मान भंगारवाले यांच्या भंगार गोदामाला अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले प्लास्टिक व इतर ज्वलनशील साहित्य यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या आगीत भंगार गोदाम जळून खाक झाले असून, लगतच्या चार- पाच घरांनाही आगीची झळ बसली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, परिसरात आगीचे उंचच उंच लोळ आणि धुराचे काळेकुट्ट लोट पसरले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंबिया शाह कॉलनी परिसरात एकच धावपळ आणि घबराट उडाली. गोदामातील प्लास्टिक व ज्वलनशील भांगराने पेट घेतल्याने आगीचा वेगाने फैलाव झाला. या आगीची झळ गोदामालगत असलेल्या नायाब शेख, अन्सार अन्सारी, जावेद कुरेशी आणि इस्माईल शहा यांच्या घरांनाही बसली. आगीमुळे घरांचेही नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत भंगार गोदाम जळून खाक झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, घटनास्थळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी भेट देऊन पाहणी केली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नसला, तरी प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. भरवस्तीत असलेल्या भंगार गोदामाला लागलेल्या या आगीमुळे परिसरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




