Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधडोंबार्‍याचा खेळ

डोंबार्‍याचा खेळ

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

वैजयंती सिन्नरकर (Vaijayanti Sinnarkar)

द्धा चिन्मयला म्हणाली, दादा, हे बघ हे काय आहे. आई म्हणाली, हा डोंबार्‍याचा खेळ. तो डोंबारी काय म्हणतो हे नीट ऐका.

- Advertisement -

माय बाप असं माय बाप

गरिबाचा खेळ बघा

पोटाला द्या

अस सर्कशीत बघायला

मिळणार नाही हाय

जागा जा बाबासा,

बाईसा, ताईसा

संजय सांगू लागला हा पाहा डोंबारी, डोक्यावर लाल फेटा, पांढरा मळकट शर्ट, खाली धोतर, जुन्या फाटक्या चपला आणि गळ्यात ढोल अडकवून कर्ता पुरुष त्याची बायको आणि मूल यांच्यासाहित संपूर्ण कुटुंब एकत्रित असते. गुणिले आकाराचे दोन खांब मातीत घट्ट पुरतात आणि त्यांना जोडणारा दणकट दोरखंड बांधतात. मग त्यांची मुले हातात पाच-सहा फूट लांब काठी घेऊन दोरखंडावर चढतात. एका टोकाला उभे राहतात. खाली तिचा डोलकर बाप, आई लोकगीत म्हणत असतात.

ढमा ढमा ढोल ग

झमा झमा झांजरी

नाचतो डोंबारी ग

नाचतो डोंबारी

रस्त्यावरील हा रंजन प्रकार. डोंबार्‍याच्या वाद्यातून येणारा आवाज आसमंत भारून टाकतो. त्याच्या दिशेने मग गावातील अबालवृद्ध गोळा होत असत. मग ती दोरखंडावर उभी असलेली मुलगी हातातली काठी आडवी करत आपला तोल सांभाळत खांबाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जात असते. ती दोरीच्या मध्ये जेव्हा उभी राहायची तेव्हा तिचा तोल जाऊन ती खाली पडणार की काय? असे वाटायचे. प्रेक्षकांचे हृदय त्या दृश्याने काहीकाळ थांबल्याचा भास व्हायचा. पण दोरीवरची मुलगी वाक्बगार. ती पडायची नाही, आपला खेळ सोडायची नाही. मग तिचा बाप प्रेक्षकातून तबके फिरवायचा.

डोंबारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, तामिळ प्रदेश, बांगलादेश व महाराष्ट्रात आढळतो. डोंबार्‍याच्या घरी मुले जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासूनच खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण म्हणजे सहा इंचाच्या गोल आगीच्या रिंगणामधून संपूर्ण शरीर आत झोकून देणे व बाहेर काढणे. दोरीवरच्या उड्या, कोंबड्याप्रमाणे उड्या. ढोलकीच्या तालावर ठेका धरून एखादी कसरत दाखवणारी मंडळी दिसली की, डोंबार्‍याचा खेळ बघायला येणार्‍या-जाणार्‍यांची पावले आपसूकच थांबतात. नाच व खेळ यांचा सुरेख संगम साधत मनोरंजन करत पोटाची खळगी भरण्यासाठी जन्माला आलेली कला म्हणजे डोंबारी कला. बार्शी तालुक्यातील माणकेश्वर हे यांचे मूळ गाव. जिथे जिथे जत्रा होतात त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम करत, आपला खेळ दाखवत, पुढच्या प्रवासाला ते निघतात. आता डोंबारीचे खेळ क्वचितच पाहिला मिळतात. अविकासाच्या दारिद्य्रात लोटल्या गेलेल्या या समाजापुढे आता कोणता पर्याय निवडावा याचे उत्तर अनुत्तरीत आहे. डोंबारी हा खेळ नृत्यप्रकार या गटात मोडतो. दोरीवरून चालत, नाचत, उड्या मारणे वगैरे कसरतीचे खेळ करणे आणि भिक्षा मागणे हा यांचा पारंपरिक व्यवसाय. विकास आणि आधुनिकतेचा स्पर्शही न झालेला असा हा डोंबारी समाज.

नाचतो हा डोंबारी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला,

आभाळ पांघरू दगड उशाला,

गाळूनी घाम आता मागूया भाकरी ।

नाचतो डोंबारी गं

नाचतो डोंबारी

वरील ओळी या डोंबारी समाजाचे वास्तव चित्र सांगणार्‍या आहेत. डोंबार्‍याचा खेळ आणि आपले लौकिक जीवन यातले साम्य दिसून येते. शरीर, मन, बुद्धी, अहंकारादी विकार आणि निसर्गदत्त साधन यांनीच आपले जीवन बनलेले असते. माणसाकडे मन आणि बुद्धी असते. मन चंचल, क्षणोक्षणी पालटती रंग असेच संतांनी लिहिले आहे. विकारांचा आपल्याशी जो खेळ चाललेला असतो तो चालू द्यायचा. तो तर तळ्यात मळ्यात पद्धतीने खेळावा लागतोच पण त्यावर विवेक आणि बुद्धीचा अंकुश सतत लावायचा. जसे ती मुलगी काठीचा तोल सांभाळते तसे संसारात आपण स्वतःला असे सांभाळत गेलो की आयुष्याचे सार्थक झाले, असे म्हटले जाते.

जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचा. हे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते, अशावेळी त्या दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे. किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. स्वतःचा मार्ग

स्वत:च्या अभ्यासाने स्वतःच्या जीवन यशासाठी शोधायचा आहे. हा संदेश आपल्याला डोंबारी त्यांच्या खेळातून देत आहे.

कीर्तनातही लाखा कोल्हाटीचे (डोंबारीचे) आख्यान सर्वांना खिळवून ठेवते. त्यातील लाखा कोल्हाटीची मुलगी चंद्रा जेव्हा दोरावर चढून खेळ सुरू करते तेव्हा तिच्याकडे पाहून वाटते.

सगुण गुण माया आली

कोल्हाटीन खेळाया

प्रपंचाचा तो रोविला वेळू

चहू शुन्यांचा मांडीला खेळू

ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू

लागती पाया

सगुण गुण माया आली

कोल्हाटीन खेळाया

अशा पद्धतीने साक्षात भगवंत तिचा खेळ पाहिला आणि तिच्या मदतीला हजर होते. डोंबारी हा फक्त कलाप्रकार नसून जीवनाशी साधर्म असणारा जीवन मार्गदर्शकही आहे. यातून आपण आपल्या जीवनात आवश्यक असणार्‍या गोष्टी घेऊन या लोककलेला जगवण्याचा प्रयत्न करूया.

डोंबारी मनात घोळत मुलांची पुढच्या कलाकाराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली

- Advertisment -

ताज्या बातम्या