घोटी | जाकीर शेख Ghoti
महामार्गावर भीतीचे साम्राज्य निर्माण करून ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असून, या कारवाईत एक मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री उशिरा, मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके शिवार परिसरात, दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी संगनमत करून ट्रकमध्ये थांबलेल्या चालक आणि क्लिनर यांना चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यांनी चालकाकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २५,००० रुपयांचा मुद्देमाल जबरीने लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. १७२/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९(४), ११५, ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या समांतर तपासात, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सचिन नामदेव घाणे (रा. बारशिगवे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) या आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने कबुली दिली की, त्याने दोन विधिसंघर्षित ग्रस्त आणि इतर साथीदारांसह मिळून ही लूट केली होती. त्याच्याकडून इनफिक्स कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही धाडसी कारवाई मा. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अंमलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे, योगेश पाटील, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, मयूर कांगणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कारवाईमुळे महामार्गावरील गुन्हेगारीवर मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी उर्वरित आरोपींच्या शोधासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.




