धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमधून वस्तू चोरी करणारी टोळी शहर पोलिसांनी उघडकीस आणली असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दुचाकीसह 1 लाख 96 हजार 489 रूपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुलातील शॉप नं. 68/69 जवळील के.व्ही. एंटरप्रायजेस येथील इलेक्टीक दुकानात चार अनोळखी महिला व एक अनोळखी पुरूष दोन दुचाकीवर आले. त्यापैकी तीन महिला दुकानात ग्राहक म्हणून जावून त्यांनी दुकानात कामासाठी असलेल्यांना बोलण्यात गुंतवून दुकानातून 15 हजार रूपये किंमतीच्या एअर कंडीशनचे इनडोअर युनिट चोरी केले.
तसेच बांबु गल्लीतील अमोल टिव्ही, देवपूरमधील सौजन्य सेल्स येथे चोरी केली. त्यामुळे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी सदर गुन्हे उघडकीस करण्याची सुचना पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना दिली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने महेश अशोक केवारे (रा. हमाल मापाडी, कृष्णवाडी, धुळे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एसी, टिव्ही, वायरलेस सिस्टीम स्पिकर व एक दुचाकी असा एकुण 1 लाख 96 हजार 489 रूपये किंमतीच्या वस्तु जप्त केल्या.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, पोहेकाँ मच्छिंद्र पाटील, पोना गिरासे, पोकाँ प्रसाद वाघ, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, शिरसाठ, पटाईत, मोरे, कराड, श्री. पाटील, श्री.सोनगीर, शेख यांच्या पथकाने केली.