Monday, October 28, 2024
Homeदिवाळी अंक २०२४सह्याद्रीचा भू राजकीय अभ्यास

सह्याद्रीचा भू राजकीय अभ्यास

सह्याद्रीकडे बघण्याचा मानवाचा दृष्टिकोन वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळा होता. सह्याद्रीतील गडकिल्ले असोत, घाटवाटा असोत, लेणी असोत किंवा निसर्गातील विविधता असो, आपला आजचा दृष्टिकोन अभ्यासक, भावनिक, साहसी वगैरे आहे. त्याला या कालखंडापूर्वीची त्याची सामरिक उपयुक्तता आणि त्याही आधीपासून असलेली धार्मिकता कारणीभूत असते.

जगभरात अनेक पर्वतरांगा आहेत. अनेक पर्वतांना धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु ज्याचा भू-राजकीय(Geopolitical) अभ्यास करता येईल असा केवळ सह्याद्री आहे. मुळात भू-राजकीय अभ्यास म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थितीचा, त्या ठिकाणी राहणार्‍या लोकांच्या स्वभावात होणारा बदल व परिणामी समाजाच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीचा अभ्यास म्हणजे भू-राजकीय अभ्यास. सह्याद्री या विषयावर भरपूर लिखाण झालंय त्यात स. आ. जोगळेकर यांचा ‘सह्याद्री’ हा ग्रंथ भू-राजकीय अभ्यासाचा परिपूर्ण ग्रंथ म्हणता येईल.

- Advertisement -

सह्याद्रीचे अंतरंग जाणून घेणे हाच मुळात एक कुतुहलाचा प्रवास आहे. त्यामुळे सह्याद्रीचा भू-राजकीय इतिहास जाणून घेण्यापेक्षा त्याअंगाने कुतूहलाचा प्रवास जाणून घेऊयात. सह्याद्रीचा इतिहास पहायचा असेल तर त्याच्या निर्मितीपर्यंत जावे लागेल पण भू-राजकीय इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मानवाचा सह्याद्रीशी संबंध कसा आला ते जाणून घ्यावे लागेल. सह्याद्रीत कुठल्याही उंच ठिकाणी चढून जाणारा पहिला मानव हा केवळ कुतुहलापोटी तिथे गेला असावा. उंचावरुन आसपासचा परिसर कसा दिसतो हेच ते कुतुहल असेल.

सह्याद्रीकडे बघण्याचा मानवाचा दृष्टिकोन वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळा होता. सह्याद्रीतील गडकिल्ले असोत, घाटवाटा असोत, लेणी असोत किंवा निसर्गातील विविधता असो, आपला आजचा दृष्टिकोन अभ्यासक, भावनिक, साहसी वगैरे आहे. त्याला या कालखंडापूर्वीची त्याची सामरिक उपयुक्तता आणि त्याही आधीपासून असलेली धार्मिकता कारणीभूत असते. गडकिल्ल्यांची निर्मिती आणि राज्य कारभार सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर होण्यापूर्वी त्या ठिकाणांना धार्मिक अधिष्ठान लाभले होते. मात्र, त्याही आधीपासून सह्याद्रीचा केवळ व्यावहारिक उपयोग प्रचलित होता. सह्याद्रीविषयीच्या कुतुहलाकडून कुतुहलाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो समजून घेतला की भू-राजकीय इतिहास उलगडत जातो.

सह्याद्रीची व्यावहारिक उपयुक्तता
सह्याद्री किंबहूना संपूर्ण पश्चिम घाट हा जगातील सर्वात मोठ्या मेगाडायव्हर्सिटी म्हणजे महाजैवविविधता असलेला पर्वतांपैकी एक आहे. दक्षिणोत्तर पसरलेली सह्याद्रीची मुख्य रांग व मुख्य रांगेला काटकोनात छेदणार्‍या उपरांगा, सह्याद्रीतील पाऊसमान, इथल्या वनस्पती व सह्याद्रीत उगम पावणार्‍या नद्या या सर्व घटकांचा प्राणी,पक्षी, तसेच कीटकांपासून माणसांपर्यंत सर्वांच्या दृष्टिकोनातून पहिला उपयोग हा अन्नाची पूर्तता हाच होता. मैदानी प्रदेशात राहणार्‍या मानवाचा अन्नपुरवठ्याच्या निमित्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध सह्याद्रीशी येतच होता. डोंगरउतारावर होणार्‍या शेतीबरोबरच गुरांच्या चराईकरीता व लाकूड फाट्याकरीता मानवाला सह्याद्रीत भटकंती करणे अनिवार्य होते. अनादी काळापासून आजतागायत सह्याद्रीची ही उपयुक्तता बदललेली नाही. आजही माथ्यावर उगवणार्‍या गवतासाठी, कारवीसाठी, तसेच पाण्यासाठी सह्याद्रीतील नैसर्गिक स्त्रोतांचाच वापर केला जातो. पावसाळ्यात हाताशी असणार्‍या या गोष्टींकरीता डोंगरात लांबवर जावे लागते आणि मग त्यातून माणसांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण होवू लागते. वार्‍या-पावसाशी झगडत डोंगरउतारावर केलेल्या शेतीतून जेव्हा जेमतेम धान्य हाती येते, त्यातून काहीएक मानवी स्वभाव घडत जातो. यातून सह्याद्रीच्या दोन्ही उतारांवरची माणसे काहीशी चिवट अन् चिकाटीची बनली आहेत. या चिकाटीचा सह्याद्रीच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भू-राजकीय जडणघडणीत मोलाचा वाटा असलेला दिसतो.
सह्याद्रीत या ना त्या निमित्ताने वावरणारा माणूस जेव्हा परिसरातील शिखरावर पोहोचायचा, तेव्हा शिखरावरून दिसणारा आसमंत पाहून अचंबित होत होता. आपल्या श्रद्धेतील सर्वोच्च दैवताचे स्थान हे

सर्वोच्च असले पाहिजे. या कल्पनेतून मग सह्याद्री ते हिमालय सगळ्याच पर्वतांची सर्वोच्च शिखरे देवतांची ठिकाणे बनली. एकदा शिखरांवरची स्थान निश्चिती झाल्यावर यथाशक्ती त्याचे रुपांतर राऊळात होवू लागले. वाटा तयार झाल्या, लोकांचा वावर वाढला. सह्याद्रीत गडकोटांची निर्मिती होण्याच्या कितीतरी अगोदर आपली दैवते तेथे विराजमान झालेली आहेत. यथावकाश देवतांचे उत्सव, यात्रा होवू लागल्या आणि राजकीय सुरक्षेच्या दृष्टीने गडकोटाच्या उपयुक्ततेची गरज निर्माण होवू लागली.

सुरुवातीच्या काळात केवळ टेहळणीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या छावण्या हळुहळू निवासी कोट आणि पुढे सर्वसमावेशक गडकोटात रुपांतर पावल्या. अस्थायी स्वरुपातील टेहळणी छावण्यांचे अवशेष आजही प्रस्थापित गडकिल्ल्यांवर आढळतात. सह्याद्री आणि गडकोट यांचे नाते हळुहळू घट्ट होवू लागले होते. महाराष्ट्रातील राजकीय चळवळींना सुरुवात मैदानी प्रदेशात झाली. बौद्ध वाङ्मयात उल्लेखीत अश्मक महाजनपदाच्या कितीतरी अगोदर नरसिंह नावाच्या राजाचा उल्लेख प्रतिष्ठानचा राजा म्हणून येतो. महाजनपदांच्या साम्राज्य होण्याच्या प्रवासातील संघर्ष अश्मकांपर्यंत आला असेल तेव्हा, तसेच नंतरच्या काळात सातवाहन वंशाच्या उदयाच्या काळात सह्याद्रीची सामरीक उपयुक्तता त्यांच्या लक्षात आल्यावर गडकोटांची बांधणी होवू लागली. सह्याद्रीतील सर्वात प्राचीन गडांचे पुरावे सातवाहन काळात घेवून जातात.

भारतातील निरनिराळ्या कालखंडातील निरनिराळ्या सत्तांच्या राजधानीच्या शहरातील महाल आपल्याला पाहता येतात. परंतु अरवली वगळता इतर डोंगरात किंवा सपाटीवर लष्करी वापराच्या उद्देशाने बांधलेले किल्ले फारसे आढळत नाहीत. मात्र सह्याद्रीत सातवाहन काळापासून तर मराठा राजवटीपर्यंत गडकोटांचा अत्यंत खुबीने वापर केलेला आढळतो. कुठलीही राजसत्ता जेव्हा संघर्षरत असते, तेव्हा बचावात्मक धोरणानुसार सुरक्षित जागेची निवड केली जाते. जागेच्या सुरक्षिततेचे निकष लावताना त्या जागेची दूर्गमता हा मोठा निकष असतोच असतो; परंतु त्याचबरोबर त्या परिसरातील रहिवासी, ज्याची मदत किंवा विरोध त्या सत्तांना मिळणार असतो, तो फार मोठा घटक ठरतो. सह्याद्रीत गडकोट बांधणार्‍या सर्वच सत्तांनी हा विचार वेळोवेळी केलेला दिसतो. सत्ता स्थिरावली, बचावाकडून आक्रमकाच्या भूमिकेत गेली की तिला मैदानात यावे लागते. शिवरायांच्या सत्तास्थापनेच्या संघर्षात पुण्याहून राजगडाकडे व राजगडाकडून रायगडाचा प्रवास आणि पुढे सातारा- पुण्यापर्यंतचा प्रवास हे सगळं सांगून जातो. शिवरायांना राजधानीची जागा निश्चित करताना रायगडाची निवड करावीशी वाटली याचं कारण केवळ त्याची दूर्गमता हे नव्हते तर मैदानी भागातील लोकांची मानसिकता आणि डोंगरी भागातील लोकांची मानसिकता यातील मूलभूत फरकदेखील होता.

डोंगरात राहणार्‍या लोकांच्या दैनंदिन अडचणींतून त्यांची तयार झालेली चिवट वृत्ती, चिकाटी आणि एकनिष्ठता मैदानात गेल्यावर बदलते. मैदानात स्थैर्य प्राप्त झाल्यावर येणारा सुखवस्तू आळस किंवा ते स्थैर्य नसेल तर भोगावं लागणारं दारिद्—य आणि परिणामी लाचारी, गुलामी कुठल्याही सत्तेला संघर्षकाळात परवडणारी नसते. मैदानी भागातील दोन टोकांच्या मानसिकतेच्या तुलनेत डोंगरी भागातील संघर्षमय वृत्ती सातवाहनांपासून यादव शिलाहारापर्यंत आणि पुढे शिवरायांपर्यंत सर्वांना उपयोगी ठरली. दोन मनोवृत्तीतील तफावत महाराष्ट्र वगळता भारतात इतरत्र आढळत नाही, याचं कारण सह्याद्री आहे. सह्याद्रीचा तेथील जनमानसांवर झालेला परिणाम आणि त्यातून महाराष्ट्राच्या व पर्यायी भारताच्या व काहीअंशी जगाच्या राजकारणातील घडामोडींचा अभ्यास म्हणजेच सह्याद्रीचा भू-राजकीय अभ्यास.

अभिजित अकोलकर, गिर्यारोहक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या