Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधदेखण्या कलावंतांची एक्झिट

देखण्या कलावंतांची एक्झिट

राजीव मुळ्ये, नाट्यलेखक, दिग्दर्शक

सत्तर-ऐंशीच्या काळात मराठी सिनेसृष्टीत एक रुबाबदार, देखणा आणि हसतमुख अभिनेता म्हणून रविंद्र महाजनी यांचे आगमन झाले.आकर्षक व्यक्तिमत्वाच्या वरदानाबरोबरच लाभलेल्या विलक्षण आवाजाला त्यांनी उत्तम संवादफेकीची जोड दिली आणि आपल्या अभिनयाला एक वेगळेपण दिले. ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटापासून मराठी रसिकांच्या मनावर त्यांनी आपला ठसा उमटवला. रविंद्र महाजनी आणि रंजना यांची जोडी तुफान गाजली. रोमँटिक हिरो म्हणून त्याच पद्धतीचे फॉर्म्युला सिनेमे रविंद्र यांना नक्कीच करता आले असते. पण त्या साचेबद्धपणामध्ये न अडकता त्यांनी विविधांगी भूमिका केल्या. निर्मितीच्या क्षेत्रातही मुशाफिरी केली. अशा या देखण्या अभिनेत्याचा उत्तरकाळ संघर्षमय राहिला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या पिढीतील अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्यासारखे ज्येष्ठ आणि प्रदीर्घ काळ मराठी-हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अभिनेते असोत किंवा प्रदीप वेलणकरांसारखा चतुरस्र अभिनेता असो; आशालता, सुलोचनादीदी अशा अनेक दिग्गज कलाकारांची एक्झिट मराठी सिनेरसिकांना आणि कलावंतांना चटका लावून गेली. त्या धक्क्यांतून सावरत असतानाच रविंद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त आले आणि सर्वांनाच पुन्हा एकदा धक्का बसला. सत्तर-ऐंशीच्या दशकामध्ये मराठी चित्रपटांचं मराठी माणसाच्या आयुष्यात एक वेगळं स्थान होतं. दूरचित्रवाणी संच दुर्मिळ असणारा तो काळ होता. त्यामुळं मराठी चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन पाहणं अपरिहार्य होतं. नंतरच्या काळात टीव्हीचं आगमन झालं; पण तेव्हा मनोरंजन वाहिन्यांचा उदय झालेला नव्हता. दूरदर्शन आणि सह्याद्री मराठी या दोन वाहिन्या होत्या. त्या काळात रविवारी मनोरंजनाची मेजवानी असायची. या मेजवानीत मराठी चित्रपटांचा समावेश असायचा. मराठीतील दर्जेदार चित्रपटांचा खजिना रसिक प्रेक्षकांसाठी या माध्यमातून खुला केला जात असे. त्या काळातील बहुतेकांनी ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘हळदी कुंकू’, ‘थोरली जाऊ’, ‘आराम हराम है’, ‘झुंज’, ‘गोंधळात गोंधळ’ यांसारखे चित्रपट पाहिले असतील. या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची अफाट पसंती मिळाली.

मुळात, रविंद्र महाजनी हे एक देखणा, रुबाबदार आणि हँडसम नायक होते. सदैव हसतमुख असणारी त्यांची भावमुद्रा प्रेक्षकांना प्रफुल्लित करणारी ठरली. सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडद्यावरील नायकाविषयीची एक अदृश्य अशी छबी असते. हा नायक सुंदर असावा, चारचौघांपेक्षा वेगळा दिसावा, प्रभावी दिसावा, त्याच्या लकबी, संवादफेक, शब्दोच्चार, देहबोली, केशरचना ही इम्प्रेसिव्ह असावी अशी त्यांची इच्छा असते. या अदृश्य कल्पनेला परिपूर्ण न्याय देणारा, तिचे सर्व निकष पूर्ण करणारा नायक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिले गेले. त्यांच्या आवाजाचा पोत त्यांच्या संवादशैलीला वेगळा बाज देणारा ठरला. हिंदी सिनेसृष्टीतल अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्या समकालीन असणारा अभिनेता म्हणून विनोद खन्नाने आपली छाप उमटवली होती. रविंद्र महाजनींना अनेक जण मराठीतील विनोद खन्ना म्हणत असत. कारण त्यांचा लूक बराचसा विनोद खन्नासारखा होता. देखणे नट अनेक असतात पण रविंद्र महाजनींचे नैसर्गिक देखणेपण वेगळे होते. आणखी एक महत्त्वाची आणि नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, रविद्र महाजनी यांना रोमँटिक हिरो म्हणून त्याच पद्धतीचे फॉर्म्युला सिनेमे किंवा पठडीबाज चित्रपट नक्कीच करता आले असते. पण त्या साचेबद्धपणामध्ये ते कधी अडकले नाहीत. त्यांनी विविधांगी भूमिका केल्या. एक कलाकार म्हणून ही बाब अधिक महत्त्वाची आहे. अन्यथा, एकदा लोकप्रियतेचे सूत्र समजले की, एकसुरी भूमिका करुन पुढे मार्गक्रमण करत राहण्यात धन्यता मानणारे अनेक कलाकार असतात. पण रविंद्र महाजनींनी तो मार्ग नाकारला.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकप्रियता लाभूनही आणि देखणेपणाचे वरदान असतानाही ते कधी उन्मादाने वागले नाहीत. सहकलाकारांसोबतचं त्यांचं वागणं हे पडद्यावरच्या गोड नायकाप्रमाणेच स्नेहपूर्ण असायचं. कारण माणूस म्हणूनही ते सुस्वभावी होते.

त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. शालेय जीवनापासूनच महाजनींना अभिनयाची आवड होती. मोठेपणी चित्रपटात काम करायचं हे स्वप्न त्यांनी बालवयातच पाहिलं होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वडिलांचं निधन झालं आणि रवींद्र यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. तो भार पेलताना कुटुंबाच्या गुजराणीसाठी रवींद्र यांनी टॅक्सी चालवण्याचा व्यवसायही केला. पण अभिनयाची ऊर्मी आणि स्वप्न तळमनात कायम होतं. त्यामुळे टॅक्सीचा व्यवसाय करत असतानाच काही निर्मात्यांना भेटत असत. या सर्व प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी आपल्या सिनेकरिअरची सुरुवात ‘सात हिंदुस्तानी’ या हिंदी चित्रपटामधून केली. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते. महाजनी यांनी त्यामध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांचे मराठी सिनेसृष्टीत आगमन झाले. ‘गोंधळात गोंधळ’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. व्ही. शांताराम यांचा चित्रपट आणि रवींद्र महाजनी यांचा पहिलाच चित्रपट चांगलाच गाजला. ‘जाणता अजाणता’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. तथापि, ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटामुळं रविंद्र महाजनींची हँडसम अभिनेता म्हणून लोकप्रियता वाढत गेली. या चित्रपटात रंजना देशमुख यांनी मुख्य नायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती. रंजना आणि रविंद्र महाजनींची जोडी त्याकाळात सुपरहिट ठरली होती. त्यांनी संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सेननसोबत ‘पानीपत’ चित्रपटातही काम केलं आहे. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं.

रविंद्र महाजनींनी साकारलेला नायक हा फारसा संघर्षशील नव्हता; पण मराठी आणि हिंदी पडद्यावर आपली छाप उमटवणार्‍या, रसिकांना विलक्षण भावलेल्या या नायकाचे वैयक्तिक आयुष्य मात्र उत्तरार्धात संघर्षमय बनले. अभिनेते म्हणून काम करत असतानाच अभिनयाव्यतिरिक्त आपला इतर काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात भागीदारी केली होती; परंतु हा सहव्यवसाय त्यांना आर्थिक अडचणीत आणणारा ठरला. या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. परिणामी, आयुष्याच्या ऐन महत्त्वाच्या वळणावर त्यांच्यासह कुटुंबाची ससेहोलपट झाली. गश्मीर महाजनी हा मराठी मनोरंजन विश्वातला आघाडीचा कलाकार रविंद्र महाजनींचा मुलगा. त्याने काही दिवसांपूर्वी या सर्व परिस्थितीबाबत एका कार्यक्रमात मन मोकळे केले होते. तसेच त्याने आणि आईने वडिलांच्या कर्जाची परतफेड कशी केली हे सांगितले होते. तो सर्व अनुभव महाजनींच्या चाहत्यांसाठी वेदनादायी होता. पडद्यावरच्या रुबाबदार, राजबिंड्या व्यक्तिमत्वाची पडद्यामागची वास्तव आयुष्यातील ही शोकांतिका अनेकांचे मन हेलावून गेली. दुर्दैवाने, त्यांच्या निधनाची कहाणीही अशीच हेलावून गेली. गश्मीरने वडिलांसोबतही अनेक सिनेमात काम केलं आहे. ‘देऊळ बंद’ या काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला चित्रपटात गश्मीर आणि रविंद्र महाजनी या दोघांचीही भूमिका होती. त्याही चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहणारी ठरली. अभिनयावर निस्सीम प्रेम करणारा हा कलावंत आता अनंताच्या प्रवासाला गेला आहे. त्यांचे स्मरण मराठी रसिकांना सदैव होत राहील. ‘देवता’ या रविंद्र महाजनींच्या चित्रपटात ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ हे एक मार्मिक गीत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांना त्यातील मर्म नव्याने उमगले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या