इंदिरानगर | वार्ताहर Indira Nagar
नाशिक शहर व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यामुळे दोन दिवसांपासून ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वडनेर गेट येथे तीन वर्षीय बालकावर हल्ला करून ठार मारल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. त्यातच वडाळा, इंदिरानगर परिसरात जनावरांवरही हल्ले झाल्याने भीती वाढली होती. अखेर 22 ऑगस्ट, शुक्रवार रोजी पिंपळगाव खांब येथील महालक्ष्मी नगर शिवारात एक प्रौढ नर बिबट्या वन विभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांत जेरबंद करण्यात आला.
वनविभागाने वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, वडाळा आणि इंदिरानगर भागात साधारण २५ पिंजरे लावले होते. यावेळी मोहन जाधव यांच्या गवताच्या मळ्यात बिबट्या लपल्याचे आढळले. परिसरातील शेतकरी तात्काळ जमा झाले. वनविभागाने संगमनेर येथून विशेष पथक बोलावले. पश्चिम विभागातील सर्व कर्मचारी, स्थानिक वनरक्षक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने बिबट्याला जाळी घालून जेरबंद करण्यात आले.
संध्याकाळी साधारण ५ ते ५.३० वाजता बिबट्या जाळ्यात सापडला. त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले आणि सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद करण्यात आले. हा बिबट्या प्रौढ नर असून वय अंदाजे ९ ते १० वर्षे आहे. त्याची तपासणी करून तो नरभक्षक आहे का हे निश्चित होणार आहे.
भीती अद्याप कायम
जरी एक बिबट्या पकडण्यात आला असला तरी अद्यापही परिसरात इतर बिबटे असल्याची शक्यता वन विभागाने नाकारलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांची भीती अद्याप कायम आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरएफओ प्रवीण निर्मल यांनी केले आहे.
घटनांची पार्श्वभूमी
वडनेर गेट येथे तीन वर्षीय बालकाचा बळी : आठवडाभरापूर्वी बिबट्याने बालकावर हल्ला करून त्याला ठार केले होते.
वडाळा व इंदिरानगर भागात गायी व बकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या.
सतत दर्शन : परिसरात बिबटे फिरत असल्याचे व्हिडिओ व माहिती दोन दिवसांपासून व्हायरल होत होती.
मुख्य वन संरक्षक नाशिक सिद्धेश सावर्डेकर उपवनसंरक्षक पश्चिम भाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत खैरनार साहेब यांना संरक्षक सुमित निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नेतृत्वाखाली वन्यप्राणी बचाव पथकातील सर्व वनपाल वनरक्षक संगमनेर रेस्क्यू टीम रक्षक वैभव भोगले रेस्क्यू नाशिक डिव्हिजन पशुवैद्यक डॉ हेमराज सुखवाल अभिजीत महाले यांच्या संपूर्ण टीमने यशस्वी व सुरक्षित रित्या मोहीम पार पाडली.
ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया
एक बिबट्या पकडला असला तरी इतर मोकाट बिबट्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आमची चिंता कमी होणार नाही. शेतकरी आणि रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी वनविभागाने अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.पिंपळगाव खांब येथे एक बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अजूनही मोकाट बिबटे असल्यामुळे भीतीचे सावट कायम आहे




