Saturday, June 29, 2024
Homeक्राईमपरप्रांतीय व्यक्तीला झाडाला बांधून अमानुष मारहाण

परप्रांतीय व्यक्तीला झाडाला बांधून अमानुष मारहाण

चोर असल्याचा संशय; पाच जणांविरुद्ध गुन्हा, चौघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना ताजी असतानाच सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (25 जून) सायंकाळी घडली असून बुधवारी (26 जून) व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आला. राजू हिरा घोष (वय 32, रा. शंकरकला, जि. मालदा, राज्य पश्चिम बंगाल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार पांडुरंग आश्रुबा बारगजे यांनी फिर्याद दिली आहे. किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, ऋतिक बाबासाहेब पुंड (सर्व रा. औसरकर मळा, सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील बाबासाहेब पुंड वगळता चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. त्याला झाडाला बांधून व लटकावून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

जखमी घोष याची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. अटकेतील चारही संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मारहाण करताना वापरलेले हत्यार, दोरी हस्तगत करायची आहे, आणखी कुणाचा सहभाग आहे याची चौकशी करायची आहे, त्यासाठी सात दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकार्‍यांनी केली. न्यायालयाने चौघांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच भांडाफोड
चोरीच्या संशयावरून राजू घोष याला झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. त्यानंतर घोष याला सोडून देण्यात आले. दरम्यान, काही वेळातच व्हिडीओ चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आपण अडचणीत येणार असा संशय मारहाण करणार्‍यांना आल्याने त्यांनी घोष याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे त्या मारहाण करणार्‍यांनी पोलिसांना सांगितले. परंतु त्याला झालेली गंभीर मारहाण व व्हिडीओ चित्रिकरण यावरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून चौघांना तात्काळ अटक केली.

एसपींनी घेतली दखल
मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यापर्यंत हा व्हिडीओ गेला. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्याचे आदेश भिंगार कॅम्प पोलिसांना दिले. घोष जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल करून रात्रीतून चौघांना ताब्यात घेत अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या