Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारट्रक चालकाकडून चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक व रोखपालास दोन...

ट्रक चालकाकडून चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक व रोखपालास दोन वर्षे कैद व पाच हजाराचा दंड

नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR

कंटेनर ट्रक चालकाकडून त्याची गाडी गव्हाळी चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक रोखपालास दोन वर्ष कैद व ५ हजारच्या दंडाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१२ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी चेक पोस्टवर मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे व सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची (दोन्ही नेमणूक , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार) हे कर्तव्यावर होते. यावेळी तक्रारदार कंटेनर/ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. ते गव्हाळी चेकपोस्टवर आले असता झोडगे व मावची यांनी कंटेनर ट्रक चालकाकडून त्यांची गाडी गव्हाळी चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४ हजार रुपये लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी करुन ती पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२,१३ (१) (ई) (ड), १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, नमूद गुन्हयाच्या तपासाअंती शहादा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात स्पेशल केस क्रमांक १२/२०१४ अन्वये खटल्याचे कामकाज चालले. यात वरील दोन्ही सरकारी अधिकाऱ्यांवर दोषारोप सिद्ध झाल्याने  न्या.सी.एस.दातीर यांनी दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष  कैदेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, कलम १३ (ड) अन्वये प्रत्येकी २ वर्ष कैदेची शिक्षा व  ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी  वकील म्हणून ॲड.स्वर्णसिंह गिरासे व तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उप अधीक्षक ए.जी. वडनेरे यांनी काम पाहिले. कोर्ट समन्वय अधिकारी तथा पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी,  पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवालदार अमोल मराठे यांनी काम पाहिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या