Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधमैत्रीचा नवा पैलू

मैत्रीचा नवा पैलू

9 ऑगस्ट 1971 रोजी भारत आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यात शांतता आणि मैत्री करार झाला. या करारानेच भारताच्या 1971 च्या युद्धातल्या विजयाचा पाया रचला. या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भारतभेटीवर येत आहेत. त्यांची ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.

कर्नल (नि.) अनिल आठल्ये

शेजारी हा तुमचा नैसर्गिक शत्रू असतो आणि शेजार्‍याचा शेजारी हा तुमचा मित्र असतो, असे आर्य चाणक्यांनी इसवी सनपूर्व चौथ्या शतकात सांगून ठेवले होते. हे शब्द आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतात. कसे ते पाहा. भौगोलिक दृष्टीने पाहिल्यास चीन हा भारताचा शेजारी देश तर चीन हा रशियाचा शेजारी देश. चीन आणि रशियाची भौगोलिक सीमा जवळपास 7700 किलोमीटर लांब असून रशियाचा अतिपूर्वेकडचा प्रदेश त्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. याचे कारण या प्रदेशात विपुल खनिज संपत्ती आढळते आणि याच प्रदेशामुळे रशिया जागतिक महासत्ता बनू शकला. रशियाचा अतिपूर्वेकडचा प्रदेश 1860 पर्यंत चीनमधल्या मंच्युरिया प्रांताचा एक भाग होता. रशियातल्या तत्कालीन रार शासकांनी हा प्रदेश चीनकडून बळकावला. रशियाचा अतिपूर्वेकडचा प्रदेश हा आपलाच एक भाग असल्याचे चीन मानतो.

- Advertisement -

या सर्व घटनांना उजाळा देण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे यंदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच बांगलादेश यंदा स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन 6 डिसेंबरला भारतभेटीवर येत आहेत. ही भेट साधीसुधी नाही. चीनसोबतचे ताणलेले संबंध बघता आपल्या दृष्टीने पुतीन यांच्या भारतभेटीचे महत्त्व खूप मोठे आहे. भारत आणि रशिया मैत्रीच्या पार्श्वभूमीवर आपण चीनला गर्भित इशाराच देऊ शकतो. भविष्यात चीनने दोन आघाड्यांवर युद्ध पुकारले तर भारताला रशियासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे चीनविरुद्ध दुसरी आघाडी उघडता येऊ शकते.

9 ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘भारत छोडो’ आंदोलनासाठी सुपरिचित असणार्‍या याच दिवशी भारत आणि तत्कालीन सोव्हिएत संघ (आजचा रशिया) या दोन देशांमध्ये ऐतिहासिक असा शांतता आणि मैत्री करार झाला होता. याच कराराने 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या विजयाचा पाया रचला होता. याच संधीने 1971 च्या युद्धादरम्यान अमेरिका आणि ब्रिटीश नौदलाला तसेच चीनला हस्तक्षेप करण्यापासून थांबवले होते. 1971 च्या युद्धात भारताला मिळालेल्या विजयात रशियाकडून मिळालेल्या लष्करी मदतीचा महत्त्वाचा वाटा होता, असे म्हणणे निश्चितच अतिशयोक्ती ठरणार नाही. 1971 च्या युद्धातला भारताचा विजय अमेरिकेसाठीच नाही तर चीनसाठीही खूप मोठा धक्का होता. कारण या युद्धादरम्यान अमेरिका, इंग्लंड आणि चीन हे तिन्ही देश पाकिस्तानच्या बाजूने भारताविरुद्ध उभे ठाकले होते. भारताने 1971 च्या ऑगस्ट-सप्टेंबरपासूनच तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली होती. याचा सुगावा लागल्यानंतर इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपले नौदल भारताच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला.

भारताचा पूर्व पाकिस्तानवरील हल्ला रोखण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेने अनुक्रमे ईगल आणि एंटरप्राईज या महाकाय विमानवाहू युद्धनौका हिंद महासागरातून बंगालच्या उपसागरात तैनात करण्याचे ठरवले. मात्र या दोन्ही देशांच्या दुर्दैवाने सोव्हिएत युनियनने त्यांच्या नौदलाचा टास्क फोर्स 40 हा ताफा भारताच्या मदतीसाठी हिंद महासागराकडे वळवला. या ताफ्यासोबत रशियाच्या आण्विक पाणबुड्याही होत्या. अत्यंत शक्तिशाली अशा रशियन नौदलासोबतचा संघर्ष टाळण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेच्या नौदलांनी हिंद महासागरातून काढता पाय घेतला. तिकडे पाकिस्तानला मदत करण्यासाठी आणि भारताचे लष्करी सामर्थ्य विभागण्यासाठी चीन 1965 प्रमाणेच भारताच्या सीमेजवळ काही तरी आगळीक करण्याची दाट शक्यता असताना पुन्हा एकदा रशिया भारताच्या मदतीला धावला. सर्वसाधारण परिस्थितीत चीन आणि मंगोलिया सीमांच्या रक्षणासाठी केवळ तीन ते चार लष्करी तुकड्या तैनात करणार्‍या रशियाने चीनची आगळीक थांबवण्यासाठी आपल्या लष्करी तुकड्यांची संख्या 42 वर नेली. 1969 च्या उसुरी नदीजवळील रशियासोबतच्या चकमकींच्या आठवणी ताज्या असल्यामुळे चीनने कोणताही धोका न पत्करता आपले लष्कर रशियन सीमेजवळ तैनात केले. रशियाने या दोन्ही आघाड्यांवर केलेल्या मदतीमुळे भारताला 1971 चे युद्ध जिंकून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेशची निर्मिती करण्यात यश आले. म्हणूनच डिसेंबर 1971 च्या विजयाचा पाया 9 ऑगस्ट 1971 च्या त्या ऐतिहासिक संधीने घालून दिला, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

1971 च्या युद्धादरम्यान झालेल्या इंग्लंड-अमेरिकेच्या हालचाली, चीनकडून असलेला धोका आणि या सगळ्याला रशियाने दिलेले प्रत्युत्तर या सगळ्या घडामोडी सर्वसामान्यांना फारशा ज्ञात नसल्या तरी युद्धविषयक जाणकारांना या सर्व घटनांची पूर्ण कल्पना आहे. मात्र असे असूनही या महत्त्वपूर्ण घटनेला 50 वर्षे होत असताना फारशी चर्चा नाही. यामागचे एक कारण म्हणजे सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध दृढ होत असताना उगाचच 1971 च्या आठवणी उकरून काढल्या तर भारत-अमेरिका संबंधांमध्ये बाधा येण्याची शक्यता लक्षात घेतली असावी. दरम्यान, 1971 मध्ये इंग्लंडची ईगल ही युद्धनौकाही भारताविरुद्ध कारवाई करण्यासाठी आली होती, याची प्रसार माध्यमांमध्ये वाच्यताही केली जात नाही. ही खरे तर आश्चर्याची गोष्ट म्हटली पाहिजे. 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत रशियासोबत शांती आणि मैत्रीचा करार केल्यानंतर भारताने खर्‍या अर्थाने अलिप्ततावादाला तिलांजली दिली होती. तसेच अमेरिका आणि अन्य राष्ट्रांच्या दृष्टीने आपण रशियाचे सहकारी किंवा मित्रराष्ट्र बनलो.

1971 पासून भारत आणि रशिया मित्रच नाही तर सहकारी होते, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. थोडक्यात काय तर 1971 मध्ये आपण अलिप्ततावादाचे धोरण पूर्णपणे सोडून दिले होते. एका दृष्टीने पाहिले तर यामुळेच आपण 1971 च्या युद्धात विजय प्राप्त करू शकलो. सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर रशिया अनेक दृष्टीने कमकुवत झाला. रशिया आणि चीनची सीमा जवळपास 3700 किलोमीटर एवढी लांब असून मंगोलियाची चार हजार किलोमीटरची सीमा जोडल्यास रशिया आणि चीन यांच्यातील सीमारेषा जवळपास 7700 किलोमीटर एवढी आहे. सीमेलगतचा हा प्रदेश मैदानी असल्यामुळे रणगाडे, तोफा आणण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. थोडक्यात या प्रदेशाचा बचाव करण्याचे मोेठे आव्हान रशियापुढे आहे. रशिया चीनच्या तुलनेत बराच कमकुवत आहे. मात्र चीन आपले अवजड रणगाडे, तोफा फक्त याच सीमेवर वापरू शकतो. तैवानवर हल्ला करून या देशावर कब्जा करणे हे चीनचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे उद्दिष्ट राहिले आहे. तैवान हे एक बेट असल्यामुळे हे अवजड रणगाडे, तोफा या देशाविरोधातल्या युद्धात वापरता येणार नाहीत. या सर्व लष्करी शक्तीचा रोख फक्त रशियाच्या सीमेकडेच आहे. अगदी भारताच्या सीमेजवळही एवढी अवजड लष्करी सामुग्री आणणे चीनला शक्य होणार नाही. या सर्व परिस्थितीचे भान रशियाला आहे आणि म्हणूनच आज आपल्या स्वत:च्या बचावाच्या दृष्टीने रशियाने चीनशी नरमाईचे धोरण अवलंबले आहे.

दूरवरचा आणि भविष्यकाळचा विचार केल्यास चीन आर्थिकदृष्ट्याच नाही तर लष्करीदृष्ट्याही महाशक्ती बनला की रशियाच्या अतिपूर्वेकडच्या भागावर आपला हक्क सांगणार हे नक्की. त्यामुळे भविष्यकाळात चीन आणि रशियामध्ये संघर्ष होणे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरीही अमेरिका आणि ‘नाटो’मधले युरोपियन देश रशियाविरुद्ध पश्चिम सीमेलगत सैन्य तैनात करत आहेत. याचा फायदा अर्थातच चीनला होत आहे. परिणामी, आज रशियाला चीनशी समेटाचे धोरण अवलंबवावे लागत आहे. हे सर्व ध्यानात घेतल्यास पाश्चिमात्य देशांचा चीन विरोध खरा आहे की बेगडी, अशा संशयाला वाव आहे. त्यांचे धोरण काहीही असले तरी भारताच्या दृष्टीने रशियासमोरचा यक्षप्रश्न लक्षात घेऊन त्यांच्याशी असणारे लष्करी, आर्थिक आणि राजकीय संबंध दृढ ठेवणे हेच चीनला उत्तर सीमेवर रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. याच कारणामुळे ब्लादिमीर पुतीन यांची भारतभेट अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच या भेटीदरम्यान भारताने 1971 च्या युद्धात झालेल्या रशियाच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे संयुक्तिक ठरेल. अखेर संकटाच्या वेळी मदतीला धावतो तोच खरा मित्र!

कर्नल (नि.) अनिल आठल्ये

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या