भारतावर मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट घोंघावत होते. सर्व पातळ्यांवर लढून त्या महासंकटावर मात करण्यात भारत यशस्वी ठरला. तरीसुद्धा करोनाचा पुरता नायनाट अजून झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी देशात करोनाचे 524 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या धडकी भरवणारी आहे. केरळात एका रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. आधीच्या सक्रिय रुग्णसंख्येत नव्यांची भर पडून करोना रूग्णसंख्या आता 3,800 वर जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती जाहीर केली आहे. रुग्णसंख्येतील नवी लक्षणीय वाढ पाहता करोनाबाबत बेसावध राहून चालणार नाही. करोना पुन्हा डोके वर काढू पाहत असताना काही दिवसांपासून देशात ‘एच3 एन2 इन्फ्लूएंझा’ या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाप्रतिबंधक लशींना फ्लूचा नवा विषाणू जुमानायला तयार नाही. हा विषाणू जोर करीत आहे. या विषाणूने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. करोना डोके वर काढू पाहत असताना फ्लूच्या नव्या विषाणूची भर त्यात पडू पाहत आहे. करोनाचा मागील कटू अनुभव लक्षात घेऊन केंद्र सरकार वेळीच सावध झाले ही चांगली गोष्ट आहे. ‘एच3 एन2’ विषाणूबाधित रुग्णांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, सर्दी आदी लक्षणे आढळून येत आहेत. नीती आयोगाने करोना कृतीदल, केंद्रीय आरोग्य सचिव आणि राज्य आरोग्य सचिवांची नुकतीच बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व राज्यांना पत्र पाठवून नव्या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी करोनाविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्यावर भर देण्याचा सल्लाही दिला गेला आहे. ताप-सर्दीच्या नव्या विषाणूसोबतच करोना नियंत्रणाच्या दृष्टीने हा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. ‘करोना संपला’ या भ्रमात लोक वावरत आहेत. लोकांनी वर्षभरापूर्वीच स्वत:ला मास्कच्या बंधनातून मुक्त करून घेतले आहे. करोनाचा ‘ताप’ कमी झाल्याने बहुसंख्य लोक निर्धास्तपणे वावरत आहेत. जे लोक अजूनही मास्कचा वापर करून सावधानता बाळगतात त्यांनाही तोंडावरचा मास्क काढण्याचा अनाहूत सल्ला मास्कमुक्तीचा आनंद घेणारे लोक उगाचच देत आहेत. नीती आयोगाने राज्यांना सावधगिरीचा इशारा देताना रुग्णालयांमध्ये खाटांची सोय, आवश्यक मनुष्यबळ, औषधे, प्राणवायू आदींच्या सज्जतेचे निर्देश दिले आहेत. अलीकडच्या काळात देशात साजर्या झालेल्या सण-उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. गर्दीची ठिकाणे कोणत्याही साथीचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून करोनाभय विसरून असुरक्षितपणे वावरणे लोकांनी टाळले पाहिजे. बेसावध लोकांना करोनाऐवजी नवा फ्लू गाठण्याची शक्यता जास्त आहे. तशी वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरातील सदस्यांना नव्या फ्लूचा उपद्रव होऊ नये म्हणून घराबाहेर नोकरी, व्यवसाय अथवा अन्य कारणांनी बाहेर पडणार्यांनी मास्क वापर, सुरक्षित अंतराचे पालन आदी प्रमुख गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. ठराविक कालावधीत उपचार केल्यावर करोनारूग्ण बरे होतात. ‘एच3 एन2 एन्फ्लूएंझा’ची लक्षणे करोनासारखी असली तरी उपचार घेऊनही ताप अथवा खोकला लवकर बरा होत नसल्याच्या तक्रारी या आजाराने बाधित झालेले अनेक रुग्ण करीत आहेत. तेव्हा नव्या आजाराला हलक्यात घेऊन चालणार नाही. आजार झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर स्वत:बरोबरच कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे आरोग्य अबाधित राहू शकेल.