Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या60 किलोमीटर लांबीचा नवीन रिंग रोड तयार करणार

60 किलोमीटर लांबीचा नवीन रिंग रोड तयार करणार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

2027 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला नाशिक महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. एकीकडे नमामी गोदा प्रकल्प ( Namami Goda Project ) सल्लागार नेमणूक शेवटच्या टप्प्यात आहे. तर दुसरीकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन विविध प्रकारच्या सूचना केल्या. दरम्यान, पार्किंगसाठी भरपूर जागा लागणार असून नवीन जागांचा शोध घेण्याबरोबरच नव्याने तब्बल 60 किलोमीटर लांबीचा नवीन बाह्य रिंग रोड तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले. नवीन रिंग रोड जलालपूर पासून सुरू होऊन एकूण 60 किलोमीटर फिरून पुन्हा जलालपूर पर्यंत येणार आहे. त्याला नवीन बाह्य रिंग रोड असे नाव सध्या देण्यात आले आहे. महापालिका प्रशासन या रोडसाठी प्रयत्न करणार असून कुंभमेळापूर्वी साधारण चार वर्षात हेनवीन रिंग रोड तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान काही भागांमध्ये हा रिंग रोडचा काही भाग 30 मीटर प्रमाणे असला तरी त्याला 60 मीटर करण्यापर्यंत विचार सुरू आहे.

रिंग रोड तयार झाल्यावर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण हलका होऊन वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. त्याचप्रमाणे जगभरातून येणाऱ्या भाविकांना देखील सर्व गावात फिरता येणार आहे. त्याचप्रमाणे मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला ज्या जागा पार्किंग साठी जागा होत्या त्याच्यातील बऱ्याचशा ठिकाणी बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने आता पार्किंगसाठी नव्याने जागा शोधण्याचा काम हाती घेतला आहे. नाशिक महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी यापूर्वीचे अनेक कुंभमेळे आयोजनांमध्ये भाग घेतलेला आहे. यामुळे महापालिका आयुक्त यांनी आज त्यांच्याकडून देखील माहिती घेऊन यापूर्वी कशा पद्धतीने काम झाले त्याचा आढावा घेतला.

घाटांची लांबी वाढणार

नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी भव्य स्वरूपात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते, म्हणून जगभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा शासनासह महापालिका प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येतात. शहरातील घाटांची लांबी वाढविण्याचा विचार सध्या सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनास दिले असून घाटांची लांबी वाढल्यास अधिकाधिक भाविकांना स्नान करण्यासाठी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल व गर्दी नियंत्रणात राहील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेला विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी नेमका किती निधी आवश्यक आहे, याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आढावा घेण्यात आल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. कुंभमेळा नियोजनात करण्यात येणार्‍या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश देखील दिले आहेत. अत्यंत चोख पद्धतीने सर्व नियोजन करण्याचे प्रयत्न आहे.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक

- Advertisment -

ताज्या बातम्या