Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून विविध मागण्यासांठी संघर्ष समितीद्वारे आमरण उपोषण

आजपासून विविध मागण्यासांठी संघर्ष समितीद्वारे आमरण उपोषण

नाशिक | प्रतिनिधी

नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सोमवारी(दि.३०) पासून मुंबईतील मुख्यालयासमोर राज्यव्यापी ‘आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना व आदेश नगरविकास विभाग, वित्त विभाग, आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन यांना दिले होते.

परंतू, ७ महिने पूर्ण होऊनही यावर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही. संघर्ष समितीच्या माध्यमातून वारंवार याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. परंतू, आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. अश्या नकारात्मक वृत्ती विरुद्ध आवाज उठविण्यासाठी सोमवारी (दि.३०) सकाळी १० वाजता बेलापूर, नवी मुंबई येथील आयुक्त तथा संचालकांच्या कार्यालयासमोर बेमुदत‘आमरण उपोषण’ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समिती मुख्य निमंत्रक डॉ. डी एल कराड,अँड.सुरेश ठाकूर,डी.पी. शिंदे,रामगोपाल मिश्रा, अनिल जाधव, मुख्य संघटक संतोष पवार,अँड.सुनील वाळूजकर, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

काय आहेत मागण्या

महाराष्ट्रातल्या सर्व सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने जो स्थगिती आदेश दिला आहे तो त्वरित निकाली काढावा, शासनाने या कामी ठोस भूमिका मांडून राज्यातील सर्व बौद्ध मातंग व इतर सर्व समाजांचा वारसांना वारसा हक्काची नियुक्ती मिळावी, त्यांना न्याय मिळवून द्यावा, प्रलंबित अनुकंपाची भरती त्वरित करावी, शासनाने नवीन निर्माण केलेल्या नगरपंचायत व नगरपरिषदेमधील सर्व कर्मचार्‍यांची उद्घोषणे पुर्वीचे उर्वरित सर्व कर्मचारी यांना विना शर्त विना अट कोणतीही शैक्षणिक अहर्तेची अट न घालता समावेशन करावे.

तसेच नगरपंचायतीमधील सर्व सफाई कर्मचारी यांची आकृतीबंध मंजूर करून सर्व सफाई कर्मचार्‍यांचे समावेशन करावे, अथवा सेवेत असताना मयत झाले असल्यास त्यांच्या वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपा तत्वावर त्वरित नियुक्ती द्यावी, स्वच्छता निरीक्षकांचे विकल्प त्वरित मागवावेत व त्यांचे समावेशन त्वरीत करावे, कंत्राटी ठेकेदार कर्मचारी यांना किमान वेतन द्यावे व त्यांना सेवेत कायम करावे, १०,२०,३० अश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्वरीत लागू करण्यात यावा, संवर्ग कर्मचारी यांचे पदोन्नती बाबत , बदली बाबतचे अडचणी , वेतन , निवृत्ती वेतन, निवृत्ती नंतरची देणी या सह विविध प्रश्नांबाबत आमरण उपोषण करण्यात येत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या