Sunday, May 26, 2024
Homeशब्दगंधआधारस्तंभ

आधारस्तंभ

– अलका दराडे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

- Advertisement -

एखादी उंच इमारत तिच्या पायावर असणार्‍या भक्कम खांबांवर उभी असते व वर्षानुवर्षे ती चांगल्या अवस्थेत असते. यालाच आधारस्तंभ म्हणतात. सर्वांचा आधार पेलणार तो आधारस्तंभ. हीच गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. आपल्या घरातील आजी आणि आजोबा आपले आधारस्तंभ असतात. आपल्या आयुष्याचा ते चांगल्या प्रकारे विचार करणारे व आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात. हे निःस्वार्थी तर असतातच पण मनाने मोठे असतात. घरातील सर्वांचे भले झाले पाहिजे यासाठी ते झटतात. ते कर्तव्यनिष्ठ आहेत म्हणून आपण आनंदात राहतो व त्यांची शिस्त आपल्याला भावते. नातवंडांमध्ये मनमोकळेपणाने रमतात, त्यांचा अभ्यास घेतात अगदी खेळतातही त्यांच्याबरोबर. नातवंडांबरोबर त्यांच्यासारखे लहान होताना त्यांना आनंद मिळतो व कर्तव्यपालनाची जबाबदारी पार पाडल्याचे सुखही मिळते. घरातील सर्वांच्याच मदतीला ते प्रथम पुढे होतात. मुलांनाही त्यांचा सहवास आवडतो कारण आई-वडील घरी नसताना हे मायेचे आधारस्तंभ त्यांना सावरत असतात. त्यांचा विश्वास असतो या वयस्कर व्यक्तींवर कारण ते कधी पडले असतील तर या दोघांनीही औषधपाणी करून त्यांना सावरलेले असते.

मुलांना हेही समजते की, आपल्याला ताप आला तरी आजी काळजीने कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते व दिवसभर तिची नजर त्या नातवंडावर असते. आपण नारळ पाहतो ना! किती टणक असते ते, पण तेच फोडले तर आत थंडगार, गोड व चवदार पाणी मिळते. हे पाणी आपण प्यायल्यास अमृतप्राशनाचा आनंद मिळतो. तसे आपले आजी-आजोबा वरून कडक, शिस्तबद्ध असले तरी त्यांच्या हृदयात मायेचा झरा असतो. त्यांचा मुलगा व सूनही त्यांच्याच आधारस्तंभामुळे मोठ्या विश्वासाने समाजात आपली नोकरी सांभाळून वावरत असतात. त्या दोघांना नोकरीतून सुट्टी मिळाली तर आजी- आजोबाही जरा निवांत होतात व विश्रांतीही घेतात, पण घरातील जबाबदारी टाळून ते कधीच विश्रांती घेणार नाहीत अथवा कामांची चालढकलही करणार नाहीत. त्यांना अपेक्षा असते फक्त प्रेमाच्या चार शब्दांची जे त्यांना घरातील सर्वांकडून मिळते. आपल्या या भक्कम आधारस्तंभांना आपणही त्यांचे वय जाणून समजून घेऊया व त्यांना नेहमीच त्यांच्या मानाचे स्थान देऊया.

(क्रमश:)

- Advertisment -

ताज्या बातम्या