Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखग्रामपंचायत स्वागतार्ह पुढाकार

ग्रामपंचायत स्वागतार्ह पुढाकार

राज्यातील अनेक ग्रामपंचायती अनिष्ट रूढी-परंपरा संपुष्टात आणण्यासाठी आणि चांगले नवे पायंडे पाडण्यासाठी स्वयंस्फूर्त पुढाकार घेत आहेत. कामेरी ही सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील एक ग्रामपंचायत! या ग्रामपंचायतीने सार्यांनीच स्वागत करावे, असा निर्णय घेतला आहे. गावातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ, जयंती उत्सव अशा कार्यक्रमांत ध्वनीवर्धक यंत्रणा आणि एलईडी लेसर किरण यांचा वापर करण्यावर कामेरी ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला, अशी बातमी माध्यमांत झळकली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडून वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेचा अनेक लोकांना त्रास होतो. रक्तदाब वाढू शकतो. हृदयाची धडधड वाढू शकते. चिडचिड होते. माणसे वैतागतात. काहींच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. डोके दुखू शकते. या आवाजात सतत राहिल्यास माणसाच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. माणसे जितकी जास्त काळ अशा आवाजाच्या सानिध्यात राहतात तितका धोका वाढत जातो. अनेकांच्या कानात शिटी वाजू शकते. मधमाशी गुणगुणल्यासारखा आवाज येतो. तो त्रास कायम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ध्वनी प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम सांगितले जातात. याचा अनुभव सामान्य माणसे नेहमी घेतात. तथापि त्या त्रासाविरोधात तक्रार करण्याचे धाडस क्वचितच कोणी करतो. भांडणे, मारामारीला माणसे घाबरतात. वाद विकोपाला जाण्याची भीती अनेकांना वाटते. मंडळांच्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांची आणि पाठिराख्यांची दहशत हेही त्यामागचे एक कारण असावे का? पुण्यातील नवी खडकी भागात नुकतीच एक घटना घडली. एका घरगुती कार्यक्रमात डीजे वाजत होता. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार एका ज्येष्ठ नागरिकाने केली. त्यामुळे त्यांना अपमानित करून हाकलून लावल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. कामेरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामान्य माणसांना होणारा हा त्रास कदाचित जाणवला असावा. ध्वनिवर्धक यंत्रणेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने जनतेच्या भावनांचा आदर राखला आहे. या निर्णयाचे ग्रामस्थ नक्कीच स्वागत करतील. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकमताने घेतलेल्या या पुरोगामी निर्णयाचा ग्रामस्थांवर प्रभाव पडू शकतो. नवे पायंडे पडतात आणि स्वीकारलेही जातात. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय एका ग्रामपंचायतीने घेतला आणि हळूहळू तो पायंडा पडला. अनेक ग्रामपंचायती त्यापासून प्रेरणा घेत आहेत. विधवांचा सन्मान राखत आहेत. रूढींमध्ये कालसुसंगत बदल करून तो अमलात आणणे सोपे नसते. अनेकांना त्यात बदल हवा असतो. तथापि सामाजिक परंपरांमध्ये बदल करण्याचे धाडस एकटी-दुकटी माणसे क्वचितच दाखवतात. तथापि लोक एकत्र आले तर गुणात्मक बदलांची प्रक्रिया थोडीशी सोपी होऊ शकते. लोकसहभाग बळकटी देऊ शकतो. कामेरी ग्रामपंचायतीचा निर्णय हा त्याचे चपखल उदाहरण! जनतेचे जगणे सुसह्य होईल याची दक्षता घेणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. त्याची जाणीव ग्रामपंचायत स्तरावर रुजत आहे ही समाधानाची बाब आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या