राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
उल्हासनगर येथील एका इसमाने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथील नितीश पवार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड चा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका व फायनान्स कंपन्यां कडून सुमारे 5 लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. नितीश दादासाहेब पवार (वय 29) हे राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे राहत आहेत. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नितीश पवार यांना मोटारसायकल घ्यायची असल्याने त्यांनी दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी श्रीरामपूर येथील आयडीएफसी बँक येथे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी तेथील बँक अधिकारी यांनी नितीश पवार यांचे सीबील चेक केले असता नितीश पवार यांचे आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून उल्हासनगर येथील मनिष पालवे याने नितीश पवार यांच्याबरोबर जॉईंट खाते उघडले आणि त्यांच्या नावावर विविध बँका, फायनान्स कंपनीचे एकूण 4 लाख 45 हजार 76 रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाचे हफ्ते भरलेले असून त्यापैकी 2 लाख 29 हजार 870 रुपये कर्ज भरणे बाकी आहे, असे समजले. त्यामुळे तुमचे कर्ज प्रकरण होणार नाही. असे बँक अधिकार्यांनी नितीश पवार यांना सांगितले.
आपण कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नसून उल्हासनगर येथील एका भामट्याने आपले आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून कर्ज काढले आहे. असे समजल्यावर नितीश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनिष अनिल पालव, रा. बिल्डींग नंबर 1416, रुम नंबर 01, स्टेशन रोड, नियर शिवधाम अपार्टमेंट महाराष्ट्र, सेक्शन 32, उल्हासनगर, याच्यावर गु.र.न. 13/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (3), 340 (1), 340 (2) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे.