दिल्ली । Delhi
झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आता चर्चा रंगल्या आहेत त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्या अनुषंगाने दिल्ली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये आता आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
केजरीवाल म्हणाले, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. आमच्या पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत आघाडीबाबत ठाम भूमिका मांडली नव्हती. मात्र, हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपने कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करण्याचा सूर आळवला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.
दिल्लीत पुढील वर्षाच्या सुरुवातीला ७० विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. सध्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभेच्या सातपैकी एकही जागा दोन्ही पक्षांना जिंकता आल्या नाहीत. इतकंच नाही तर निवडणुकीतील पराभव आम आदमी पक्षामुळे झाल्याचंही काँग्रेसने आरोप केला होता.