Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआरे जंगल अखेर वाचले

आरे जंगल अखेर वाचले

मुंबई | Mumbai –

वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे मधील 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली

- Advertisement -

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून मेट्रो कारशेड मुळे अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या आरेच्या जंगलावरील कुर्‍हाड दूर झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तसेच आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आरेच्या जमिनीबाबत निर्णय घेताना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. आरे भागात आदिवासी वस्ती आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना त्याचा प्रथम विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवले जावेत, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आरेच्या जमिनीसाठी वन कायद्याचे कलम 4 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली आरेची सुमारे 600 एकर जमीन वनासाठी राखीव झाली आहे. आता 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्यानंतर नेमकं किती क्षेत्र वनासाठी राखीव असेल व किती वगळायचं याचा अंतिम निर्णय होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या