आपल्या शरीराचे सर्व काम नियंत्रित करणारा महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात काहीही बिघाड झाली तरी त्याचा परिणाम मेंदूवर जाणवतो.
दौलताबादचे एक व्यावसायिक सुधाकरराव यांचाही अनुभव असाच आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा उजवा पाय थोडा जड पडल्यासारखे वाटले. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. पण पुढे त्रास वाढतच गेला. पुढे डोकेदुकी सुरू झाली आणि काही दिवसांनी डोळ्यांची दृष्टीही कमी झाली.
फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी सीटी-स्कॅन करून घेतला तर आलेल्या रिपोर्टने सगळेच हबकून गेले. अत्यंत किरकोळ वाटणार्या या तक्रारींचे मूळ मेंदूमध्ये झालेल्या एका गाठीत होते.
डोक्याच्या कवटीमध्ये एका खोबणीमध्ये मेंदू असतो. संपूर्ण शरीराचे नियंत्रण करणार्या या मेंदूत असंख्य संवेदन नसांचे जाळे असते. त्यामुळे तो द्रव पदार्थांसारखा असतो.
या कॅन्सरचे ठोस कारण अद्याप अज्ञात आहे. अनुवंशिक व्याधी आणि पर्यावरणातील काही घटकांमुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता आढळून आली आहे. विविध रासायनिक पदार्थ, किरणोत्सारांचा संपर्क, तंबाखू, विद्युत चुंबक किरणांचा संपर्क यामुळे हा आजार होऊ शकतो.
काही प्रकारच्या गाठी मेंदूच्या मूळ पेशींपासून तयार होतात, तर काही प्रकारच्या कॅन्सर पेशी अन्य अवयवांकडून मेंदूकडे पोहोचतात आणि त्या गाठ तयार करतात. वारंवार होणारी डोकेदुखी, उलट्या होणे, बोलताना त्रास होणे, दृष्टी कमी होणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, अर्धांगवायूचा झटका येणे, चालताना तोल जाणे, चेहरा वाकड होणे, गिळतांना त्रास, आवाजात बदल होणे, फिट येणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे यात आढळतात.
सीटी-स्कॅन ही यातील निर्णायक तपासणी ठरते. मेंदूतील गाठ, तिच्या कॅन्सरचा प्रकार, गाठीचा आकार, अवस्था, रचना हे सारे तपासणीत समजते. काही रुग्णांच्या मेंदू व मज्जातंतूच्या सभोवतालचा द्रवपदार्थ पाठीच्या कण्यातून काढून तपासला जातो. जर्म सेल ट्यूमरसाठी ट्यूमर मार्कर ही तपासणी करण्यात येते. काही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या तपासणीतही डोळ्यांमध्ये झालेले बदल समजतात. गरजेनुसार काही रुग्णांची गाठीची सुई टाकून तपासणी करण्यात येते.
रुग्णाची शारीरिक अवस्था व कॅन्सरचा प्रकार लक्षात घेऊन उपचार केले जातात. शस्त्रक्रिया हा महत्त्वाचा उपचार मानला जातो. या शस्त्रक्रियेत मेंदूमधील संपूर्ण गाठ काढून टाकली जाते. यावेळी मेंदूला कमीत कमी इजा पोहोचेल, असा प्रयत्न केला जातो. मेंदूची मूळ रचना गुंतागुंतीची असते.
त्यामुळे शस्त्रक्रिया शक्य नसेल तर अन्य उपचार केले जातात. सध्या काही नवीन उपचारांचेही संशोधन झाले आहे. गाठ तीन सेंटिमीटरपेक्षा लहान असेल तर गॅमा नाईफ या आधुनिक पद्धतीने काढता येते. शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ सर्वच रुग्णांना रेडिएशन दिले जाते. ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया शक्य नसते त्यांच्यासाठी हे उपचार दिले जातात. कॅन्सरची तीव्रता अधिक असलेल्या व उपचारानंतर पुन्हा उद्भवलेल्या रुग्णांमध्ये हा उपचार केला जातो.
किमोथेरपीचा यात उपयोग होत नाही. मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील असंख्य अडथळ्यांमुळे औषधे तेथपर्यंत पोहोचत नाहीत. इम्युनो थेरपीमध्ये रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यात येते. मेंदूच्या कॅन्सरवर याचा अधिक लाभ व्हावा यासाठी संशोधन सुरू आहे. ढशोूेश्रेाळवश या गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध औषधांचा अनेक रुग्णांना लाभ होतो.
या रुग्णाला उपचार झाल्यावर फिट येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित औषधे आणि नियमित तपासणी आवश्यकच ठरते. उपचारानंतर काही रुग्णांना बोलायला किंवा दिसण्यातही त्रास होतो. अशा वेळी घाबरून न जाता योग्य व्यायाम, वैद्यकीय सल्ला उपयोगी ठरतो.