Monday, November 18, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : बहिरे मूल

आरोग्यदूत : बहिरे मूल

डॉ प्रमोद महाजन 

बालक बहिरे आहे हे ते काही महिन्यांचे असतानाच जर लक्षात आले तर श्रवणयंत्राचा वापर लगेच चालू करावा. त्यामुळे त्याचा माणसाच्या आवाजाशी व वातावरणातील इतर प्रकारच्या आवाजांशी परिचय होतो व त्यामुळे योग्य वेळी ते बोलावयास लागते. बाहेरच्या आवाजाला योग्य प्रत्युत्तर देते. त्याने लवकरात लवकर व चांगले बोलणे शिकावे म्हणून त्याच्या शिल्लक असलेल्या श्रवणशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

- Advertisement -

पालकांचा सहभाग

बहिर्‍या मुलाचे पालक फार महत्त्वाचे व प्रभावशील शिक्षक असतात. कारण ते एकसारखे मुलाला शिकवितात. त्याची काळजी घेतात. त्याला खेळण्यासाठी, फिरण्यासाठी मदत करतात व प्रेमाची ऊब देतात. त्यामुळे बहिर्‍या मुलाच्या संपूर्ण प्रगतीसाठी आणि प्रगतीच्या स्वरुपावर त्यांचा फार परिणाम होतो.

समाजात इतर सवंगडी वा लोक जरी चिडवीत असले तरी आई-वडिलांचा दृष्टिकोन मुलांसाठी नेहमीच प्रेमळ, समजूतदारपणाचा व सोशिक स्वरुपाचा हवा. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या योग्य पायाभरणीस नेहमीच मदत होते. बहिर्‍या मुलाच्या सामाजिक व भावनिक वाढीवर बराचसा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रमाणात जर त्याची काळजी घेतली गेली नाही तर ते एकलकोंड्या स्वभावाचे व असमतोल भावनांचे होतात.

म्हणून बहिरे बालक अति परावलंबी होणार नाही, याची काळजी आई-वडिलांनी घ्यावयास हवी. त्यासाठी त्याला नेहमी अतिसंरक्षण न देता आवश्यक तेवढेच संरक्षण द्यावे. त्यामुळे त्याच्या बुद्धीची, भावनांची, व्यक्तिमत्त्वाची, प्रगतीची वाढ निरोगी स्वरुपाची होते. अशी मुले भविष्यात स्वावलंबी बनतात. परंतु मुले तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकली नाही तरी वारंवार त्यांच्यावर न रागावता त्यांना प्रोत्साहित करावे.

या मुलांचा घरकामात, बाहेर तुमच्या धंद्यांमध्ये मदत करण्यास शिकवा. प्रात्यक्षिकानेही मुले लवकर शिकतात. प्रात्यक्षिकच्या स्वरुपातून त्यांना नवीन नवीन जगाचा, आनंदाचा व उमेदीचा शोध लागतो. हे करण्यासाठी बर्‍याचशा मार्गांनी बालकाला शिकविता येते. त्यासाठी ऑडिओलॉजिस्ट, स्पीच थेरापिस्ट शाळेतील शिक्षक व शिक्षिका, मानसशास्त्रज्ञ वगैरे लोग वेगवेगळ्या प्रकारे आई-वडिलांना विविध दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात व मार्ग दाखवितात. तुमच्या मुलाची प्रगती होत आहे किंवा नाही. कोणत्या बाबतीत अधिक प्रगती होत आहे व कोणत्या बाबतीत कमी प्रगती होत आहे, याची जाणीव करून देतात व आवश्यक प्रगती अधिक व्हावी म्हणून मार्गदर्शन करतात.

बहिर्‍या बालकाचे दोष व त्यांच्या मनातील गैरसमज वेळीच ओळखले गेल्यास ते दोष काढून टाकण्यासाठी व पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना त्वरित करता येते. स्वत:च्या पूर्ण विकासासाठी बहिरे मूल पूर्णपणे समाजातील मुख्य प्रवाहात मिसळणे आवश्यक असते. बहिर्‍या मुलावर पालकांनी वेळेवर खर्च करण्याची टाळाटाळ करू नये. परंतु सामान्यत: बहुतेक लोकांमध्ये ही टाळाटाळ केली गेलेली आढळते. नंतर वेळ निघून गेल्यावर मात्र पालक मुलासाठी भरपूर पैसा खर्च करण्याची तयारी दाखवितात. जे पैसा उशिरा खर्च करतात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने कंटाळू वा निराश होऊन आपण स्वत: पुरेसे प्रयत्न केले. पण यश आले नाही असे म्हणून भविष्यातील सतत करावे लागणारे प्रयत्न करणे हे लोक टाळतात. बहिर्‍या मुलांवर अर्भकावस्थेपासूनच योग्य वेळी योग्य प्रमाणात पैसा, वेळ व श्रम खर्च व्हावयास हवा. नाहीतर पुढील प्रकारचे परिणाम जाणवतात.

1) अपूर्ण आरोग्यसेवा (तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळेवर सल्ला न घेणे व तो वेळेवर घेतल्यास पूर्ण प्रमाणात पाळण्याचा प्रयत्न न करता अर्धवट केल्यावर अपेक्षेप्रमाणे प्रगती झाली नाही. म्हणून प्रयत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय थांबविणे.)  

2) शिक्षकांवर शिकविण्यासाठी बराचसा ताण पडतो. 

 3) शैक्षणिक स्वरुपाचे अपूर्ण मार्गदर्शन व अपूर्ण सेवा. 

4) पालक-शिक्षक व पालक-डॉक्टर चर्चा वेळेवर मधून मधून न होणे अथवा फक्त मर्यादित स्वरुपातच होणे. 

5) त्याचेसाठी अपूर्ण प्रमाणात खेळावयाची व शिक्षणाची उपकरणे विकत घेतली जातात. 

6) बहिर्‍या मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन प्रकारचे महत्त्वाचे मार्ग उपयोगात आणावेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या