काही प्रकारच्या मनोविकारांमध्ये आपल्याला आजार आहे अशी जाणीव नसते म्हणजे आजाराचा आपण स्वीकार करत नाही. काही स्वभावदोष हे अशाच प्रकारात मोडणारे मनोविकार होत. त्यातील एक म्हणजे शीघ्रकोपी स्वभावदोष.
शीघ्रकोपी रुग्णांना स्वतःला आपल्या विकृतीची जाणीव नसली तरी सोबत असणार्या नातलग व मित्र परिवाराला त्यांचा खूप त्रास सहन करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येणारा शीघ्रकोपी स्वभावदोष या विकारात उदासीनता, भ्रमिष्टपण, व्यसनाधीनता इत्यादी विकारही जोडीला दिसून येतात.
लग्नाला 8-10 वर्षे झाली तरी बालीच्या सासरकडील नातलगांच्या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. त्यातील बहुतांशी तक्रारी या तिच्या शीघ्रकोपी वागण्याबद्दल असायच्या.
तसे विवाहानंतर नवीन घरी ती सर्वांशी अगदी मिळून मिसळून राहायची. पाहुण्यांची आवभगत चांगली ठेवायची, सर्वांशी नाते चांगले राहावे याची पुरेपूर काळजी घ्यायची, सर्वांसोबत गप्पा मारायला, अधिकाधिक वेळ घालवायला, सोबत जेवायला तिला आवडायचे.
मात्र तिच्या मनासारखे कुणी तिला वेळ देऊ शकले नाही किंवा वागण्यात थोडीशी ही उणीव काढली की तिचा संताप दुसर्या टोकाला पोहोचे. या भयंकर क्रोधाच्या भरात स्वतःवरील संपूर्ण नियंत्रण सुटल्यासारखे ती वागत असे. मोठ्यांसोबत वादविवाद, आरडाओरड, शिवीगाळ, वस्तूंची फेकाफेक, आदळआपट, तोडफोड इत्यादी प्रकार घडायचे.
मोबाईल फोन आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल तर तिच्या रागाचे नेहमी बळी ठरायचे. संतापात हाता-मांडीवर ब्लेडने रेघोट्या मारणे, घर सोडून जाण्याच्या अथवा आत्महत्येच्या धमक्या देणे आणि तसे विफल प्रयत्न करणे तिच्याकडून घडायचे. तिच्या मनगटावर पूर्वी स्वतःच दिलेल्या कापांचे अनेक व्रण होते. थोड्या वेळाने क्रोध शांत झाल्यावर तिला आपल्या वाईट वर्तणुकीची जाणीव होई आणि तिला अपराध्यासारखे वाटे.
असे पश्चाताप झाले तरीही मनाविरुद्ध काही झाल्यास तेच प्रकार वारंवार घडायचे. तिचे असे वागणे इतरांना विचित्र आणि विक्षिप्त वाटायचे. त्यामुळे एक एक नातलग तिच्यापासून दूर होऊ लागले. तिचे बरेचसे मित्र-मैत्रिणी याच कारणास्तव तिच्यापासून दुरावले होते.
आपण नेहमी बरोबरच असतो आणि समोरच्याचीच चूक असते अशी तिची धारणा असे. त्यासाठी एखाद्याची सहानुभूती, मदत किंवा फक्त त्यांचा वेळ मिळवण्यासाठी परिस्थितीत अतिशयोक्तीपूर्ण वागणे, त्यांचे लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वाटेल ते ती करायची.
एकटे असल्यास तिला खूप रिकामे आणि कंटाळवाणे वाटायचे. कधी उदासीनता, कधी अतिउत्साह तर कधी चिडचिड, क्रोध असे भिरकवे तिच्या मन:स्थितीत दिसून यायचे. तिच्यासारखे भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेले लोक सदैव संकटात सापडलेले दिसतात.
या स्वभावामुळे ते आपल्या क्षमतेएवढे काम करू शकत नाही. त्यांना अधूनमधून सूक्ष्म काळासाठी भ्रमिष्ट, विमनस्क अवस्था ग्रासते. या अवस्थेत संशय घेणे, विचारातील सुसूत्रता भंग पावणे, भास होणे इत्यादी प्रकार दिसून येतात.
लक्ष आकर्षित करण्यासाठी, कर्तव्य टाळण्यासाठी, दुःखी मन:स्थितीत हाता-मांडीवर चिरा देणे, चटके लावणे असे विध्वंसक वागणे वारंवार दिसते. तसे केल्याने त्यांना एक प्रकारे समाधान मिळते. त्यांना स्वप्रतीमा आणि व्यक्तिमत्त्व खूप अस्थिर जाणवते.
पराधीनता व प्रतिरोध अशा दोन्ही भावना मनात असल्यामुळे इतरांसोबत त्यांचा नातेसंबंधांचा धागा कमकुवत असतो. अगदी जवळच्या माणसासोबत ते अतिलगटपणा व अतिक्रोध अशा दोन्ही भावना व्यक्त करतात. स्वतःमध्ये बदल करून घेण्याची इच्छा, समुपदेशन, व्यवहार कौशल्य, शिक्षप्रद उपदेश, आवेग-नैराश्य-भ्रम नियंत्रणासाठी औषधी इत्यादी उपचारात वापरता येतात.