डॉ प्रमोद महाजन
हा रोग फार सुप्तपणे कानात सुरू होतो. बहुतेक रोग्यांमध्ये एकाच वेळी दोन्ही कानात सुरू होतो व हळूहळू वाढतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही वर्षे रोगी दुर्लक्ष करतो.
हा रोग वंशपरंपरागतही असू शकतो. या रोगाचे प्रमाण तरुण वयात जास्त असून स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक आढळतो. गरोदरपणात हा रोग अधिक वाढतो. नंतरच्या प्रत्येक गरोदरपणात हा रोग वाढण्यास संभव असतो.
रोग्याला सुरुवातीच्या काळात किंचित बहिरेपणा जाणवतो व कानात सूं सूं संगीतात्मक आवाज निर्माण झाल्याचे जाणवते. हळुहळू काही वर्षांमध्ये बहिरेपणा व कानातील सूं सूं आवाजाचे प्रमाण वाढते.
रोग्याचा कान दुखत नाही. अथवा त्यामधून पू बाहेर येत नाही; त्यामुळे बाहेरून रोगाचे स्वरुप समजत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळात रोगी त्याकडे दुर्लक्ष करतो.
काही रोग्यांमध्ये हा रोग वाढण्यात एक अथवा दोन दशके एवढा काळ लागतो. बहिरेपणाची व कानातील आवाजाची त्याला सुरुवातीच्या काळात इतकी सवय होते की ह्या रोगाचे दुष्परिणामांचे महत्त्वच त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून रोगी तज्ज्ञ डॉक्टरांकडे योग्य उपचारांसाठी उशिरा पोहोचतो.
बहिरेपणाची सवय रोग्याला होते. त्यामुळे स्वत:हून रोगी उपचारासाठी क्वचितच येतो. इतरांच्या आग्रहास्तव रोगी डॉक्टरांकडे पोहोचतो.
रोग्याला गोंधळाच्या ठिकाणी अधिक चांगला आवाज ऐकू येतो. उदा. चालत्या बसमध्ये त्याला ‘पॅराक्युसीस’ म्हणतात.
या रोग्यांमध्ये मध्यकर्णात ‘रिकीब’ या हाडाच्या आतील बाजूच्या हाडाच्या सांध्यावर निर्माण होणार्या जाडीमुळे कडकपणा वाढतो. त्यामुळे ध्वनीवहन मध्यकर्णातून अंतकर्णात होत नाही. काही वेळा अंतकर्णातही हाडाचा कडकपणा वाढतो. या दोन्ही ठिकाणी होणार्या दोषामुळे बहिरेपणा येतो.
तात्पुरता उपाय म्हणून रोग्याने श्रवणयंत्र वापरण्यास हरकत नाही; परंतु शस्त्रक्रिया करून घेणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे रोग्यामध्ये नैसर्गिक श्रवणशीलता कायम राहते. या शस्त्रक्रियेला ‘स्टॅपीडेक्टोमी’ असे म्हणतात.
सोडियम फ्ल्युओराईड (ओटोफ्लोअर) गोळ्यांनी रोगाच्या सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात फायदा होतो.
बहिरेपणामुळे रोग्यामध्ये निराशा निर्माण होते. त्याचा स्वभाव एकलकोंडा बनतो. म्हणून या मानसिक बाबतीतही उपचार होणे आवश्यक असते. जर बहिरेपणा अति असेल तर रोग्याने ओठांची भाषा व हावभावांची भाषा शिकावी.