Monday, November 18, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : अंगावर जाणे

आरोग्यदूत : अंगावर जाणे

डॉ विकास गोगटे 

अंगावरून पांढरे जाणे याला संस्कृतमध्ये ‘श्वेतप्रदर’ असा शब्द आहे. प्रदर म्हणजे वाहणे, यालाच बोलीभाषेत पदर असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला ‘व्हाइट डिस्चार्ज’ ‘ल्युकोर्‍हिआ’ म्हणतात. धुपणी हा शब्दही या रोगाला वापरतात.

- Advertisement -

या स्त्रावाचा रंग जास्त करून पांढरट असल्यामुळे श्वेतप्रदर, तर पाळीच्या वा इतर वेळी लाल स्त्राव जातो, त्याला रक्तप्रदर अशी संज्ञा आहे. डोळ्याचे मामुली चिपडणे, तोंडात लाळ येणे, नाक ओलसर असणे या गोष्टी जितक्या नैसर्गिक आहेत तसेच पाळीच्या अलीकडे वा पलीकडे किंचित पांढरट स्त्राव होणे सामान्यच मानावे.

त्या काळी गर्भाशय मुखाजवळील ग्रंथी अधिक स्त्राव सोडत असल्यामुळे ते लक्षण दिसते. या स्त्रावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला वास नसतो व त्याचा आतील कपड्यांवर (अंतर्वस्त्रावर) विशेष डाग पडत नाही. मुली वयात येताना, गर्भारपणात असा स्त्राव होत असतो. बीजनिर्मिती, तसेच शरीर संबंधावेळी उत्तेजना येऊनही मामुली स्त्राव येतो. स्त्रीचे शिक्षण, सामाजिक स्थिती व स्वच्छतेच्या कल्पना यावरून या लक्षणाची तीव्रता कमी-अधिक लक्षणे दाखवतो.

वरील कारणांशिवाय गर्भाशयाच्या मुखावरील जखम (यालाच चांदी पडणे म्हणतात.) जंतू, बुरशी, एकपेशीय जीव ट्रायकोमोनल यामुळेही प्रदर होतो. योनीत काही शल्य गेल्यास तेथे काही गाठ, मग ती साधी असो वा कर्करोगाची धुपणी हे लक्षण दिसते. गर्भाशय व अवती भोवतीच्या अवयवांचे विकार यामध्ये स्त्राव वाढतात.

ट्रायकोमोनल या जीवाणूमुळे होणार्‍या धुपणीत स्त्राव हिरवट, पिवळसर, फेसकट असतो. त्याला दुर्गंधी अधिक असते. योनीभोवती स्त्राव हे लक्षणही असते.

यीस्टमुळे होणारा बुरशीजन्य योनीदाह सर्वाधिक प्रमाणात पाहावयास मिळतो. ही बुरशी केवळ योनीलाच नव्हे तर तोंडालाही बाधा करू शकते. या रोगात योनीला अवतीभोवती खाज, दह्यासारखा चिकट घट्ट स्त्राव, तो भाग लाल होणे, त्याला कपड्याचा स्पर्श सहन न होणे ही लक्षणे असतात.

वरच्यावर बाथरूमला जाण्याची इच्छा होणे व त्या वेळी जळजळ असे लक्षणही असू शकते. बुरशीवरूनच एखाद्या गोष्टीस ‘बुरा येणे’ शब्द वापरत असावेत.

बुरशी करते सरशी

बुरशी ही सगळेकडेच असते. ती सर्वांच्या गुद्द्वारात व स्त्रियांंच्या योनीतही सुखाने नांदत असते. योनीमुळे बुरशीबरोबर काही जंतूही असतात. लॅक्टिक अ‍ॅसिड बॅसिलस या जंतूमुळे तेथील आम्लता योग्य प्रमाणात ठेवली जाते.

म्हणजे तेथे एक सामूहिक सहजीवनच वसलेले असते. मात्र काही कारणांनी तेथील समतोल बिघडल्यास बुरशी तेथे सरशी करून उपद्रव करू शकते. जंतूविरोधी औषधे वापरल्यास मधुमेह, गर्भारपण, गर्भनिरोधक गोळ्या, अपुरी विश्रांंती, कुपोषण या कारणांनी देखील बुरशी तेथे रोग करते. असा त्रास झाल्यास डॉक्टर काही औषधे देतीलच त्याबरोबर पुढील काळजी उपयोगी पडेल.

निरोध करू नका विरोध

काही वेळा शरीर संबंधांमुळे पुरुषांकडून हा रोग होतो. पुरुषांना या बुरशीमुळे काहीही लक्षण नसले तरी स्त्रियांमध्ये ते रोग देऊ शकतात. स्त्रीवरील उपचार चालू असताना नवर्‍याचेही उपचार करणे आवश्यक ठरते.

त्याबरोबर निरोध वापरल्याने बुरशी (व गुप्तरोग, एड्स इ. इतर रोगही) परत परत होत नाही. अंंतर्वस्त्रे घट्ट असल्यास विशेष करून सिंथेटीक वस्त्रांनी तेथील तापमान वाढून घाम अधिक येतो.

त्या वस्त्रांमध्ये तो जिरत नाही व वाळतही नाही. असे दमट, गरम, अंधारे वातावरण म्हणजे बुरशीच्या वाढीला आमंत्रणच असते. (आठवा, पावसाळ्याच्या दिवसात दुर्लक्षित राहिलेला एखादा कपडा अथवा ब्रेड) सुती अंतर्वस्त्रे वापरणे व शक्य असल्यास रात्रीच्या वेळी ‘बर्थ-डे सूट’मध्ये झोपणे फायदेशीर ठरते. सुती कपडेही सैलसर, हवा खेळवणारे हवे.

धोबीकामाचे शिक्षण घ्या :

कपडे धुताना शर्ट जसा कॉलर व कफपाशी (बाहीपाशी) जास्त साफ करावा लागतो. तसेच आतील कपडे लिंगाच्या अवतीभोवती येणार्‍या भागात ब्रशने अधिक घासावीत. ती ब्लिचिंग पावडरच्या मिश्रणात 24 तास बुडवून मग धुवावीत. धुतानाही भरपूर स्वच्छ पाण्यात खंगाळून, खळबळून काढावीत. जेणेकरून त्यात सफाईची पावडर (डिटर्जंट) नावालाही राहणार नाही. कपडे वाळल्यानंतर त्यावर इस्त्री फिरवावी. यामुळे बुरशी बर्‍याच प्रमाणात मरून आटोक्यात येईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या