नंदन रहाणे
असे म्हटले जाते की जितक्या आकृती, तितक्या प्रकृती आणि जितक्या प्रकृती तितक्याच प्रवृत्तीही! निसर्गाने या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पध्दतीची घडवली आहे. डोंगर वेगळा, नदी वेगळी, अरण्ये वेगळे, वाळवंट वेगळे, झाड वेगळे, वेल वेगळी, पशू वेगळा, पक्षी वेगळा… हे झाले एकेक वर्ग. पण इथेच विविधता थांबत नाही! डोंगर म्हटला तरी हिमालयातला, सह्याद्रीतला, अरावलीतला असे अनेक प्रकार असतातच. नदी म्हणता क्षणी सिंधू, गंगा, नर्मदा, कावेरी, महानदी यातले फरक जाणवतातच. ‘अरण्य’ हा उच्चार होताच हिमाचल प्रदेशातील, गंगेच्या सुंदर बनातले, छत्तीसगढ मधले, केरळ मधले जंगल अलग असल्याचे चित्र उभे राहाते… वड, आंबा, ताड, पळस ही झाडे सारखी नाहीत. उंट, बिबट्या, तरस, गाढव, मांजर हे प्राणी कुठे समान आहेत? फळांबद्दल, फुलांबद्दल, पानांबद्दल किड्यांबद्दल, दगडांबद्दलही हेच म्हणता येईल… आणि मग माणसांविषयी?
वेगवेगळ्या देशांमधली वेगवेगळ्या वंशामधली, वेगवेगळ्या पर्यावरणांमधली माणसेही भिन्नभिन्न आकारांची, अलगअलग रंगरुपांची, उंची व बांधा यात फरक असलेलीच दिसून येतात. जपानी, अरबी, निग्रो, रेड इंडिअन, एस्कीमो यांच्यात जमीनअस्माना इतका भेद टिपता येईल. त्यांचे खाणे पिणे अलग, भाषाबोली अलग, खेळणेनाचणे अलग, जगणे वाढणे अलग… पण एक गोष्ट बहुधा सर्वांमध्ये समान आढळते आणि ती म्हणजे मानवासह सर्व पशुपक्ष्यांना, फळाफुलांना, झाडाझुडुपांना तसेच पर्वत, वने, नद्या, समुद्र, ग्रह, तारे यांना बनवणारी कुणीतरी एक श्रेष्ठ शक्ती आहेच. दिसत नसली तरी तिचे कर्तृत्व अनुभवता येतेच. मग जो तो आपापल्या कल्पनेप्रमाणे त्या शक्तीचे वर्णन करतो. तिच्या स्वरुपाला चित्ररुप, शिल्परुप देतो अन् मग त्याचीच पूजा सुरु करतो. जितकी माणसे… तितक्या त्यांच्या देवसंकल्पना! आणि जितक्या कल्पना… तितके त्यांचे देव, त्यांच्या आकृत्या, त्यांच्या मूर्त्या, त्यांच्या पूजा, उपासना… यातूनच वैविध्य वाढते, पण भेदही निर्माण होतो! खर्या ईश्वरीय तत्त्वाचा अनुभव मात्र यापेक्षा फार वेगळाच असतो….
आमुचे संचिती होते
तैसे जाले।
परब्रह्म आले ।
भावे घरा ॥1॥
अंतरी बाहरी कोंदाटली
भक्ती ।
सायुज्यता मुक्ती ।
होऊनी ठेली ॥2॥
ठेलो अनिवार,
यावे जावे नाही।
सद्गुरुच्या पायी ।
ऐसे जाले ॥3॥
जाले बोलो काय,
नि:शब्दी ठकार ।
आजपा उच्चार ।
जप नाही ॥4॥
नाही आहे मिथ्या,
द्वैताचा निरास ।
अद्वैती समरस ।
शेख महंमद ॥5॥
वारकरी संप्रदाय ज्यांना ‘आपले संत’ मानतो त्या शेख महंमद यांचा हा अभंग आहे. नामदेव, ज्ञानदेव हे प्रारंभीचे मार्गदर्शक अत्यंत उदार होते. त्यांनी सर्वांना हरिभक्तीचा आणि ती व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले. साहजिकच हिंदू धर्मातील सर्व जातींमधले, स्तरांमधले भक्त, भाविक, वारकरी संप्रदायाकडे वळले. त्यात परिसा भागवतांसारखे ब्राह्मण होते, तसे चोखा मेळ्यासारखे अस्पृश्यही होते. संतही नाथ, दत्त अशा पंथांची पार्श्वभूमी असलेले तर भक्तही जैन, लिंगायत अशा धर्मामधले असे मोठे स्वारस्यपूर्ण चित्र वारकरी संप्रदायाचे दिसून येते. यात काही तर चक्क मुसलमानही आहेत. त्यांपैकी शेख महंमद यांना संतत्त्वाचा मान दिला गेलाय, त्यांचे वडील राजे महंमद यांनी आपल्या या मुलाला चांद बोधले या शिष्याचेच शिष्यत्व देऊन घडवले. त्यातून एक उदारमतवादी तत्वज्ञ व संतकवी आकाराला आला.
शेख महंमद यांनी योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंकप्रबोध हे ग्रंथ आणि विपुल काव्यरचना केली. या अभंगात ते म्हणतात, आमचे संचित उत्तम होते म्हणून आम्ही भक्त झालो आणि आमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष परब्रह्मच घरी आले! तेव्हा, हृदयात जी श्रध्दा दाटलेली होती, तिनेच सगळे घरअंगणही कोंदाटून गेले. चारी मुक्तींपैकी जी सर्वश्रेष्ठ मुक्ती सायुज्यता, तिचाच लाभ झाला. हे इतक्या अनिवारपणे घडले की आता कुठे दर्शनाला, यात्रेला जाण्याचीही गरज उरली नाही. हे कसे झाले हेही सांगता येत नाही. अगदी निःशब्द होऊन गेलो, जपाचा उच्चारही आता करवेना, मात्र हरिस्मरण आत चालूच आहे! काय आहे, काय नाही, काय खोटे, काय भास, काय खरे, काय देव, काय भक्त असे द्वैत संपून गेले आणि सद्गुरुच्या कृपेने मी परब्रह्माशी पूर्णपणे समरस झालो…




