Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग २७ - जाले सुखाचे पर्वत

आषाढीची भावदिंडी : भाग २७ – जाले सुखाचे पर्वत

नरेंद्र रहाणे

- Advertisement -

हल्ली प्रत्येकजण मोबाईल वापरतोच. हे यंत्र फार तर 10-15 वर्षांपूर्वी आले आणि बघताबघता सगळ्यांच्या जिवनाचा अविभाज्य भाग होऊन बसले. या एका उपकरणाने 7-8 जबाबदार्‍या घेऊन माणसाचे काम फारच सोपे केले. मोबाईलमध्ये वायरलेस फोन आहे. कॅमेरा आहे. घड्याळ आहे टॉर्च आहे. तो रेडिओप्रमाणे बातम्या देतो. तो टीव्ही प्रमाणे कार्यक्रम दाखवतो. थिएटरसारखे सिनेमेही दाखवतो, चित्रे व कागदपत्रे कुठेही पाठवतो. जगातल्या कुठल्याही भागाचे नकाशे दाखवतो. हवी ती माहिती हवी तेव्हा पुरवतो. हरवलेले जुने मित्रही शोधून देतो… इतकी ज्याची उपयुक्तता, ते यंत्र आपल्या जीवनाचा ताबा घेणार यात काय आश्चर्य? आपल्याकडून मोबाईल फक्त एका गोष्टीची अपेक्षा करतो.. आणि ते म्हणजे त्याच्यातील बॅटरीच्या चार्जिंगची! आठवण ठेवून तेवढे एक काम केले की मोबाईल आपल्या सेवेला तयारच असतो!

YouTube video player

आपण माणसेही त्या मोबाईलसारखीच नव्हे का? आपणही अनेक जबाबदार्‍या घेऊन वावरत असतो. मुलगा म्हणून आईवडीलांकडे लक्ष द्यावे लागते. नवरा किंवा बायको म्हणून संसाराला लागणार्‍या 100 वस्तू आणाव्या लागतात किंवा न्याहारी व जेवण बनवून वाढावे लागते. बाप म्हणून मुलांना वह्यापुस्तके देणे, क्लासला नेऊन सोडणे हेही करावे लागते. नोकरीधंद्याच्या ठिकाणी राबावे लागते. सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांत सहभागी व्हावे लागते. अशा एक ना दोन, अनेक पातळ्यांवर कार्यरत राहावेच लागते. त्यासाठी शक्ती लागते, उत्साह लागतो… साहजिकच आपल्यालाही चार्जिंगची आवश्यकता भासते ! हे चार्जिंग कोण करून देते ? तर संतांचे विचार आणि पंढरीची वारी यातून ती ऊर्जा आपल्याला मिळते ! एवढे शेकडो किलोमीटर, उन्हात पावसात चालत जाऊन, जेवण-झोप यातली गैरसोय सहन करून, लाखो लोक पंढरीला का जातात ? तर, या एक महिन्याच्या वारीतून, पूर्ण वर्षाचे। चार्जिंग होऊन जाते म्हणून! तुकोबांचे बंधू या अभंगात तेच सांगताहेत..

माझ्या भावे केली जोडी, न सरेचि कल्पकोडी ।
चालूनी आणिले धाडी। आघवेच वैकुंठ ॥1॥
आता न लगे यावे जावे, कोठे काहीच न करावे ।
जन्मोजन्मी सुखे खावे । बैसोनसे जाले ॥2॥
असंख्य संख्या नाही वारस आनंदे दाटले अंबर ।
त्रिभुवनी या अपार । साठवितान माये ॥3॥
अवधे भरले सदोदित, जाले सुखाचे पर्वत ।
तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सापडले ॥4॥

नामदेवांच्या मुलांनी, ज्ञानदेवांच्या भावंडांनी, चोखोबांच्या पत्नीने, बहिणीने, मेव्हण्याने, मुलाने अभंग लिहिले… त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या धाकच्या भावाने सुद्धा अभंगरचना केली. त्याने, तुकोबांना जे भोगावे लागले त्यासाठी विठ्ठलाशी कडाडून भांडणही केले आहे. मात्र, या अभंगात तो अध्यात्माचा आनंद काय तेही सांगत आहे… माझ्या भावाने म्हणजे तुक्याने जे काही जोडले, ते कल्पांतीही सरणार नाही. त्याने थेट वैकुंठावरच धाड घालून तिथले कैवल्य लुटून इथे आणलेय. आता देवाच्या शोधात कुठे जायला नको की निशदा होऊन परत यायला नको कसले ही कष्टसायास न करता, बसून सुखाचे घास खाता येतील, तेही जन्मोजन्मी! या अध्यात्मफलाचा आनंद केवढा? तर सारे आकाठाही भरुन जावे आणि त्रिभुवनी ही साठवता येणार नाही इतका अनंत अवार…


आता सगळे काही ओसंडून वाहात आहे. आत्मा, प्राण, मन, बुद्धी, देश, घरसंसार, अंगणवरस, गोवारीवार, शहाळ मावळ… सगळे काही साफल्यानेे तुडुंब भरलेले आहे तेही सदोदित ! सुख वाढता वाढता इतके उंच वाढलेय की जणू त्याचेच पर्वत झाले आहेत! म्हणून तुकारामांचा हा भाऊ म्हणतोय की आम्हांला परमार्थाचे जे धन सापडलेय ना, ते अगदी अदभुत आहे! आबाद शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात पंढरपूरला त्याच परमार्थाचे पॉवर हाऊस अगदी भरात असते आणि लाखो वारकर्‍यांची जीवने तिथे पुरेपूर चार्ज होत असतात !!!

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...