मुंबई | Mumbai
‘अंकुश’ सिनेमातील ‘इतनी शक्ती हमे देन दाता..’ या लोकप्रिय प्रार्थनेचे गीतकार अभिलाष यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांच्यावर काही महिन्यांपूर्वी पोटाच्या आतड्यांचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांचे निधन झाले आहे. गोरेगाव येथील त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.
गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. पण आर्थिक कारणांमुळं त्यांच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्या पत्नी नीरा अभिलाष यांनी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी (आयपीआरएस) कडे तातडीनं आर्थिक मदत मागितली होती.
अभिलाष हे बॉलिवूडमधील एक नामांकित गीतकार होते. १९८३ साली ‘अंकुश’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही प्रार्थना लिहिली होती. या प्रार्थनेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. जवळपास आठ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेली ही प्रार्थना आजही तितकिच लोकप्रिय आहे. ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या प्रार्थने शिवाय त्यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘आज की रात न जा’, ‘वो जो खत मुहब्बत में’, ‘तुम्हारी याद के सागर में’ ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्याची निर्मिती केली. तसेच ७०-८०च्या दशकातील अनेक चित्रपटांचे संवाद देखील त्यांनी लिहिले. अभिलाष यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.