Friday, November 15, 2024
Homeराजकीयसत्य लपविण्यासाठी खोटेनाटे आरोप - कळमकर

सत्य लपविण्यासाठी खोटेनाटे आरोप – कळमकर

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तपोवन रस्त्याच्या कामात डल्ला मारण्याचा प्रयत्न शिवसेनेमुळे हाणून पडण्याच्या भितीने घाबरगुंडी उडालेल्या विरोधकांकडून मी महापौर असताना मंजूर प्रोफेसर कॉलनी परिसरातील पथदिव्यांच्या कामांबाबत चुकीचे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत असल्याचा दावा, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केला आहे.

- Advertisement -

पथदिवे बसविण्याचे काम विद्यमान आमदारांनी बंद पाडले होते. त्यामुळे कामच पूर्ण न झाल्याने कामाचे बिलही ठेकेदाराला अदा करण्यात आले नाही. ही वस्तुस्थिती आरोप करणारांनी आधी स्वत:च्याच नेत्याकडून माहिती करून घ्यायला हवी होती, असा सल्ला त्यांनी आरोप करणार्‍यांना दिला.

बिले अदा झालेली नसताना पथदिव्यांमध्ये घोटाळा झाला हे त्यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. उलट मीच आता या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार आहे. विरोधकांनी या पथदिव्यांचे काम पूर्ण का झाले नाही याचे उत्तर स्वत:च्याच नेत्याला मागितले पाहिजे. चुकीचे आरोप करण्याच्या नादात ते स्वत:च्याच नेत्याला अडचणीत आणत आहेत, याचे भानही त्यांना राहिले नाही. खाबूगिरीत माहीर असलेल्यांकडून तपोवनचे सत्य लपवण्यासाठी खोटेनाटे आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे जोरदार प्रत्युत्तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिले आहे.

मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रोफेसर कॉलनी परिसरातील पथदिव्यांच्या कामात 50 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे बोट दाखवले होते. या आरोपाला कळमकर यांनी प्रत्युत्तर दिले असून जे स्वत:च न बसवलेल्या पथदिव्यांच्या घोटाळ्यात आकंठ बुडालेले आहेत, त्यांनी असे आरोप करणे संयुक्तिक नसल्याचे कळमकर यांनी म्हटले आहे.

कळमकर म्हणाले की, बीआरजीएफमधून 50 लाखांच्या निधीतून सदर काम प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, हे काम विद्यमान लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे ठेकेदाराने पूर्ण केले नाही. ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आलेले असताना त्यात घोटाळा कसा होवू शकतो याचे उत्तर आरोप करणारांनी दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आज पथदिव्यांबाबत आरोप करीत आहेत, त्यांचेच हात न बसवलेल्या पथदिव्यांचा मलिदा खाताना बरबटलेले आहेत. ‘लोटके’ प्रकरणामुळे त्यांची उडालेली भंबेरी अजून नगरची जनता विसरलेली नाही.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव म्हणाले की, दुसर्‍यांची चांगली कामे डोळ्यात खुपणार्‍यांचे उपनगरातील अनेक नसते उद्योग बाहेर काढता येतील. सावेडी कचरा डेपोला विरोध करून तो हलविण्याची भूमिका घेणार्‍यांनी नंतर कोणता मलिदा मिळाल्याने कचरा डेपो स्थलांतराचा विषय सोडून दिला याचेही उत्तर मिळणे अपेक्षित आहे. कचरा डेपो चालवणार्‍यावर अचानक मेहेरनजर का करण्यात आली हाही प्रश्न आहे. तपोवनचे बिंग फुटल्याने दिशाभूल करणारे आरोप करण्याचा उद्योग सुरु करणारांनी विचारपूर्वकच आरोप केले पाहिजे.

शिवसेनेचे उपशहरप्रमुख दीपक सावंत म्हणाले की, माजी नगरसेवक निखील वारे हेही सध्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून खोटेनाटे आरोप करीत आहेत. परंतु, ज्यांनी लोकसभेला भाजपचा झेंडा हाती घेतला व नंतर विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा मिरवला, अशा लोकांच्या बोलण्याची विश्वासर्हता किती असू शकते, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या