Friday, September 4, 2026
HomeनगरAhilyanagar : 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणार्‍या गोवंशाची होणार नोंदणी

Ahilyanagar : 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणार्‍या गोवंशाची होणार नोंदणी

सुरभी चेयन श्रृंखला योजना || उच्च प्रतीची वंशावळ जतन करण्यासाठी उपक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

नगरसह राज्यातील गोवंशी जनावरांमधून जादा दूध देणार्‍या उच्च प्रतीच्या गोवंशाचे जतन करून त्याचे संवर्धन करण्यासाठी सरकारने ‘सुरभी चेन श्रृंखला’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी, गोशाळा, पांजरपोळ यांच्याकडे असणार्‍या उच्च प्रतीच्या गायी- म्हशी, 20 लिटरपेक्षा अधिक दूध देणार्‍या गोवंश यांच्या नोंदणी सरकारच्या पशूधन प्रणालीवर ‘सुरभी चयन श्रृंखला’ या योजनेअंतर्गत अत्युत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या गाई- म्हशींची माहिती संकलित करून त्याचा उपयोग भविष्यातील दूध उत्पादन वाढीसाठी करण्यासाठी केंद्र शासनाने सुरभी चयन श्रृंखला योजना कार्यान्वित केली आहे.

भारत 1998 पासून जगात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असून देशात 2022-23 मध्ये 231 दशलक्ष टन दूध उत्पादित झाले आहे. भारतामध्ये गायींच्या 53 व म्हशींच्या 20 जाती आढळून येतात. तथापि, उर्वरित सुमारे 70 टक्के गायी गावठी आहेत. सर्वच जातींची सरासरी दूध उत्पादन क्षमता कमी आहे. परंतु काही गायी आणि म्हशी उच्च दूध उत्पादन देणार्‍या असून त्या जातीवंत आहेत. भविष्यात जास्त दूध देणार्‍या जातीवंत गायी आणि म्हशी तयार करण्यासाठी सध्याच्या उच्च वंशावळीच्या गायी-म्हशींचे जतन करणे आवश्यक आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन याकरिता प्रयत्नशील आहेत.

सध्या देशात 172 पशुपैदास केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी मागील पाच वर्षांत सात ठिकाणी मध्यवर्ती पशुपैदास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या सर्व प्रक्षेत्रामध्ये पशुधन संख्या कमी प्रमाणात आहे. म्हणून देशातील उच्च वंशावळीच्या विविध जातींच्या गायी आणि म्हशींची नोंद करून, त्यांची पैदास करून, त्यांचे वितरण इतर पशुपालकांना करणे, त्यांचे जतन करणे आणि दूध उत्पादनाच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याची संगणकीकृतप्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.

यामुळे सुरभी चयन श्रृंखला ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत गोशाळा, पांजरपोळ आणि पशुपालकांकडील उच्च वंशावळींच्या जातीवंत जास्त दूध देणार्‍या जनावरांचा शोध घेणे, अशा सर्व जनावरांची यादी त्यांच्या दूध उत्पादनासह प्रसिद्ध करणे, जातिवंत जनावरे पाळणार्‍या पशुपालकांना आणि गोशाळांना प्रोत्साहन देणे, तसेच सदर जनावरांचे प्रमाणीकरण करणे समाविष्ट आहे. पशुपालकामध्ये जनजागृती करून त्यांना उच्च वंशावळीची जनावरे पाळण्यास आणि पैदास करण्यास उद्युक्त करणे आवश्यक आहे.

सरकारच्या सुचनेनुसार पशूसंवर्धन विभागाकडून प्रत्येक गावात उच्च प्रतीच्या गावंश आणि 20 लीटरपेक्षा अधिक दूध देणार्या गायींची माहिती भारत सरकारच्या पशुधन प्रणालीवर नोंदवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,300 हून अधिक गायींची माहिती नोंदवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यातून पाच हजारांहून अधिक गायींची माहिती या प्रणालीवर अद्ययावत करण्यात येणार आहे.
– दशरथ दिघे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.

अशी राबवणार योजना
योजना राबविण्याच्या पद्धतीमध्ये गावागावांतील पशुवैद्यक गोठ्यांना भेटी देऊन अशा जनावरांची माहिती घेण्यात येईल. सदर जनावरे जातिवंत असल्याची खात्री केली जाईल व त्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या जनावरांची दूध मोजणी केली जाईल. तसेच अशा सर्व जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीमध्ये अद्ययावत केली जाईल. जातिवंत व उच्च उत्पादनक्षमतेच्या जनावरांचे पालन करणार्‍या पशुपालकांना उच्चतम वंशावळीच्या वळूंच्या वीर्यमात्रा उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हास्तरावरून निवड झालेल्या सर्व जनावरांची पडताळणी करण्यात येईल. तसेच उच्चतम अंशावळीच्या वळूच्या वीर्यमात्रा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती पूशसंवर्धन विभागाचे माजी उपायुक्त डॉ. सुनील तंबारे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...