सकाळी साडेआठ-नऊची वेळ. ग्रामीण भागातील मुले शाळेत तशी लवकरच येतात. घरात अठरा विश्व दारिद्य्र. निदान शाळेत भरपेट जेवण मिळते, या अपेक्षेने. माझ्याकडे तिसरीचा वर्ग. एवढीशी सात-आठ वर्षांची मुले पिशवीत वह्या आणि पुस्तक घेऊन येतात. मग ते त्यांच्या दप्तराला एका झाडापाशी आराम करायला ठेवतात आणि ग्रामीण खेळ खेळण्यात मग्न होतात. 10 वाजता घंटानाद अर्थात मुलांच्या जेवण्याची वेळ. पटकन हात-पाय धुवायचे आणि त्यांच्या विसावलेल्या दप्तराकडे पळायचे. पिशवीतले ताट जणू त्यांच्या येण्याची वाटच बघत असते. कौतुकाने बघावा असा सोहळा असतो हा. त्यांचे निरागस जगणे, खेळणे, बोलणे… त्यांच्याविषयीचाच विचार त्यावेळी मनात असतो.
रोजच्या प्रमाणे आजही मी त्यांचा दिनक्रम बघण्यात गुंग होते. अचानक साडीचा पदर खेचल्याचा भास मला झाला. मागे वळून पाहिले. विशाल होता तो. मी विचारले, ‘काय रे?’ त्याने खिशातून अबोलीचा गजरा काढला. माझ्या हातात दिला आणि म्हणाला, ‘ए, हे बघ, तुझ्यासाठी… ह्यो गजरा लाव.’
मला कौतुक वाटले त्याचे. मी गजरा हातात घेतल्यावर त्याचा चेहरा एकदम खुलला. मी त्याला काही म्हणायच्या आत ताट घेऊन तो जेवायला पळालादेखील. त्याची ही हसरी छबी डोळ्यांसमोरून सरकली आणि आठवला पहिलीत असलेला विशाल.
वर्गात मी हजेरी घेतली. अचानकच माझे लक्ष त्याच्याकडे गेले होते. तो रडत होता. त्याची विचारपूस केल्यावर कळाले की त्याची पाठ दुखत होती. पाठ बघितली तर त्याच्या पाठीवर पट्ट्याने मारल्याचे वळ होते. त्याला त्याविषयी विचारताच त्याने अधिकच रडायला सुरुवात केली. त्याच्या घराशेजारी राहत असणार्या मुलाने त्याचे वडील दारू पिऊन त्याला खूप मारत असल्याचे स्पष्टीकरण मला दिले. काळीज हेलावले. खूप छान आणि निरागस, गोंडस हास्य चेहर्यावर असण्याच्या वयात विशालच्या चेहर्यावर कायमच दु:खाची छटा असायची. वर्गातल्या कुठल्याही उपक्रमात सहभागी होण्याची त्याची तयारी नसायची. कायमच भेदरलेला आणि अस्वस्थ असायचा तो. पहिलीचाच मुलगा, पण त्याच्या चेहर्यावर कायमच निरागसतेऐवजी प्रौढत्वाचे सावट असायचे.
एक दिवस दुपारी अचानक त्याची आजी मला भेटायला म्हणून शाळेत आली. कोणीतरी पालक वर्गापाशी आल्याचे लक्षात आल्यावर मुलांना अभ्यास देऊन मी वर्गाबाहेर पडले. आजींनी बोलायला सुरुवात केली. ‘म्याडम, ईशालचा बा लय आजारी हाये. लय दारू ढोसली त्यानं अन् पडला खळ्यात… त्येला नेलाय हास्पिटलात… तेवढं ईशाला सोडा म्हंजी त्येला बी नेता येईल. लय खत करितोय त्येचा बाप.’ मी म्हटले, ‘ठीक आहे, न्या त्याला, पण लवकर शाळेत आणून सोडा. अभ्यास मागे पडतो त्याचा.’ त्यावर दोन दिवसात त्याला परत शाळेत आणण्याचे कबूल करून आजी विशालला घेऊन गेल्या. जो बाप त्याला एवढे मारतो, त्याला आजारपणात विशालची खंत वाटावी याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
विशालचा विचार करतच पुढचे पाच-सहा दिवस निघून गेले. दोन दिवसांनी परत येणारा विशाल बरोबर सातव्या दिवशी शाळेत आला. त्याला सोडायला त्याचे वडील आले होते आणि विशेष म्हणजे वडिलांसोबत असूनही विशालच्या चेहर्यावर एक सुंदर हसू होते. परिपाठ होईपर्यंत त्याचे वडील शाळेतच थांबून राहिले. परिपाठानंतर सर्व मुले वर्गात आली. नेहमीप्रमाणे मी हजेरी घेतली. हजेरी झाल्यावर विशाल माझ्याजवळ आला. त्याने टेबलावर अबोलीचा गजरा ठेवला. गजरा ठेवताना माझ्यासाठी आणल्याचे त्याने आवर्जून मला सांगितले. खूप प्रसन्न चेहरा होता त्याचा. प्रौढत्वाची छाया संपून निरागसतेचे भाव त्याच्या चेहर्यावर असल्याचे मला जाणवले. या पाच-सहा दिवसांत असे काय घडून गेले असावे? जादू व्हावी की चमत्कार? असो. पिल्लू आनंदात आहे हेच खूप आहे या विचारात मी गुंतले. तेवढ्यात विशालचे वडील वर्गात आले. दारूच्या उग्र वासाने अबोलीच्या मंद सुवासावर मात केली. त्याचे वडील अक्षरश: हात जोडून उभे राहिले. काही म्हणायच्या आतच त्यांनी बोलायला सुरुवात केली. ‘म्याडम, मला कळतंय वो, लय चुकतंय माझं. म्या लय हाणितोय ईश्याला, पण काय करू वो, ही दारू समोर आली की सगळच भासून (हिरावून) जातं… कामं बी व्हत नाहीती माझ्याच्यानं. आन म त्येचा राग पोरावं निघतू… लय दुख वाटतं. आजच म्या त्येला समोर बशीवलं आन् त्येची बी माफी मागितलीया… तेला खाऊ घेऊन देला.’
विशालच्या वडिलांचे बोलणे अर्धवट तोडतच त्याची आजी मागून येऊन बोलली, ‘हा ना वं… ईश्याला खाऊ घेऊन देला आणि जाऊन ढोसली परत… आन् कडमडला हिकडं… आमी याला ते का म्हणिता? व्यसनमुक्ती केंद्रात न्यायचा ईचार करतया…. ना हे बेनं आलं हिकडं. आता काय करावं?’ आजींचे बोलणे तोडतच विशालच्या वडिलंनी पुन्हा बोलणे सुरू केले. ‘तर… बरं का म्याडम्, मी काय म्हणीत व्हतू. म्या जाणारे तिकडं… मला बी कळतया म्या मगाच म्हणलो ना तुमाला… म्या तुमाला हे सांगाया हिकडं आलतू की लेकराकडं लक्ष असू द्या…’ हात पुन्हा जोडले आणि कोणत्याही उत्तराची अपेक्षा न करता दोघं मायलेक निघून गेले.
मी विशालकडे बघितले. तो मुलांमध्ये खेळण्यात गुंग होता. त्याच्या चेहर्यावरचे हसू कायम होते. वडिलांनी खाऊ घेऊन दिला म्हणून तो आनंदात होता… की वडील महिनाभर कुठे तरी लांब जाणार आहेत याचा आनंद; हे कोडे मला उमगत नव्हते. असो… पण विशाल मात्र त्या दिवसापासून आनंदात राहायला लागला होता. अभ्यासात प्रगती झाली. सर्वच उपक्रमांत स्वत:हून सहभागी व्हायला लागला होता. सर्व सकारात्मक बदल त्याच्यात होत होते आणि मुख्य म्हणजे दररोज अबोलीचा गजरा किंवा कोणतीही रानफुले तो माझ्यासाठी आणायचा. ती पण अगदी त्याच्यासारखीच, टवटवीत.
काही दिवसांनी त्याचे वडील व्यसनमुक्ती केंद्रातून परत आले. अगदी पूर्णपणे व्यसनमुक्त होऊन. त्यांचे कुटुंब अगदी व्यवस्थित चालू आहे. विशाल आता पाचवीत शिकतोय. अभ्यासात उत्तम प्रगती करतोय. मधला काळ पटकन डोळ्यांसमोरून सरकला. विशालने दिलेला गजरा अजूनही माझ्या हातातच होता. विशालचे जेवण एव्हाना झाले होते. त्याने दिलेला गजरा तसाच माझ्या हातात बघून तो माझ्यासमोर पुन्हा येऊन उभा राहिला. तो पण थोडे रागावून…. अगदी कंबरेवर हात ठेऊन मला म्हणाला, ‘काय बं? न्हाई लावलास नं गजरा? कसा लावशीन? च्यापच नसंन न तुह्याकडं?’ पटकन हातातले ताट पिशवीत ठेवून तो त्याच्या बहिणीकडे पळाला. बहिणीकडून पिन घेऊन आला आणि माझ्या हातात देत म्हणाला, ‘धरा ह्यो च्याप… आन् लाव आता गजरा….’ मी केसात गजरा माळेपर्यंत तिथेच उभा राहिला. मी गजरा केसात माळल्याची खात्री करून तो पुन्हा पळाला.
खरेच, विशालच्या कुटुंबाप्रमाणे व्यसनाच्या खोल गर्तेत रुतलेल्या प्रत्येक कुटुंबात अबोलीचा सुगंध दरवळेल का, या विचारात अबोलीचा मंद सुवास केसात खोचत सकारात्मकतेचा गजरा मी केसात माळला.