शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
ऊसाने भरलेल्या ट्रँक्टर-ट्रेलरच्या मागील चाकाखाली दुचाकी अडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 23) दुपारच्या सुमारास शेवगाव-पैठण रस्त्यावर क-हेटाकळी गावाच्या शिवारात घडला.
विठ्ठल रावण सोनवणे (वय 27, रा. बहीरगड, ता. घनसांगवी, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव असून दादाराव शेषेराव जाधव (रा. जोड मालेगाव, ता. गेवराई, जि. बीड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैठणहून शेवगावकडे ऊसाने भरलेला ट्रँक्टर-ट्रेलर जात होता. त्याच वेळी विठ्ठल सोनवणे व दादाराव जाधव हे दुचाकीवरून शेवगावहून पैठणकडे जात होते.
क-हेटाकळी गावाच्या शिवारात अचानक ट्रँक्टर-ट्रेलरच्या मागील चाकाखाली दुचाकी अडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात विठ्ठल सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दादाराव जाधव गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ शेवगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी रात्री उशिरा संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




