शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शहरातील गजबजलेल्या बाजार समितीसमोरील पाथर्डी-नगर रस्त्याकडे जाणार्या चौकात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात शेवगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ विजयराव जगन्नाथ काकडे यांचे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत निधन झाले. या अपघातानंतर शेवगाव शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून शहरात बोकाळलेल्या बेशिस्त वाहतुकीचा विषय पुन्हा समोर आला आहे. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासनाला आणखी किती बळी हवेत?असा संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर रामबाण इलाज असणार्या रस्त्याचा प्रस्ताव बसताना बंद करून ठेवल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. शहरातून पाथर्डी, नगर, नेवासा, श्रीरामपूर, गेवराई, बीड, पैठण औरंगाबाद, मिरी, पांढरीपुल या रहदारीच्या प्रमुख रस्त्यासह क्रांतिचौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गाडगे बाबा चौक, महात्मा गांधी चौक या प्रमुख चौकात दिवसभर वाहनांची गर्दी असते.
रविवारी तर आठवडे बाजाराच्या दिवशी नेवासा रस्त्यावरील दुभाजकावर बसणार्या भाजी विक्रेत्यांबरोबरच या रस्त्याने धावणार्या वाहनामुळे शेवगावकरांना भाजीपाला जीव धोक्यात घालून खरेदी करावा लागत आहे. शहरात सध्याच्या भाजी बाजाराची जागा अपुरी ठरत असल्याने ग्रामीण भागातून आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्यांना रस्त्याच्या मधोमध असणार्या दुभाजकावर बसण्याची वेळ आली आहे. बोकाळलेल्या बेसुमार वाहतूक व्यवस्थेतून आतापर्यंत अनेक निरपराधांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकजण याठिकाणी जायबंदी झालेले आहेत. त्यातच रविवारी अपघातात अॅड. काकडे यांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन शहरातील वाहतूक व्यवस्थेवर उपाय शोधणार का? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
रविवारी दुपारी खाजगी कार्यक्रम आटोपून अॅड. काकडे घरी येत असताना बाजार समितीच्यासमोर दुचाकीवर जात असताना एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाई व समर्थकांनी मोठी गर्दी केली. अॅड. काकडे हे पुरोगामी डाव्या विचारसरणीचे होते. संयमी, मितभाषी असलेले काकडे यांचा तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग होता. बोधेगाव जिल्हा परिषद गटाचे काही वर्ष त्यांनी नेतृत्व केले. स्व. बबनराव ढाकणे यांचे जुन्या काळातील विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जात होते. केदारेश्वर साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. 1995 ला काँग्रेसकडून पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणी केली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांचा मागे पत्नी, विवाहित मुलगा अॅड. युवराज व अॅड. अभिजित यांच्यासह विवाहित मुलगी असा परिवार आहे. जनशक्ती मंचचे अॅड. शिवाजीराव काकडे यांचे भाऊ व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे ते दीर होत.