Wednesday, September 30, 2026
HomeनगरAccident News : मुलीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी वडिलांचा अपघातात मृत्यू

Accident News : मुलीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी वडिलांचा अपघातात मृत्यू

बस्ता बांधून घरी परतत असताना भरधाव दुचाकीने दिली धडक

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना समोरून येणार्‍या भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत एका पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खर्डा गावापासून एक किलोमीटर अंतरावर घडली. महादेव लक्ष्मण फरताडे (वय 45, रा. गोसावीवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव लक्ष्मण फरताडे यांच्या मुलीचे लग्न 7 मे 2026 रोजी निश्चित झाले होते. लग्नासाठी कपड्यांचा बस्ता बांधण्यासाठी ते खर्डा येथे आले होते. बस्ता बांधून झाल्यानंतर ते आपल्या बजाज प्लेटिना मोटारसायकलने नातेवाईक अभिषेक चव्हाण यांच्यासह भूममार्गे गावाकडे निघाले होते.
खर्डा गावापासून काही अंतरावर आले असताना, समोरून येणार्‍या एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत भरधाव वेगात चालवली. या भरधाव दुचाकीने फरताडे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महादेव फरताडे हे हवेत उंच उडून थेट रस्त्यावर डोक्यावर आदळले . गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर अज्ञात आरोपी चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला. याप्रकरणी अभिषेक चव्हाण (वय 18, रा. वंजारवाडी, ता. जि. बीड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत व पोलीस हवालदार संभाजी शेंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान,अवघ्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असताना, वडिलांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कपड्यांचा बस्ता घेऊन घरी परतणार्‍या वडिलांचा मृतदेह घरी पोहोचल्याने संपूर्ण गोसावीवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...