नेवासा । प्रतिनिधी
नेवासाफाटा येथे रविवार (दि.१२) रात्री आठच्या सुमारास नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सुरेशनगर, हंडीनिमगाव येथील अनिल फिलीप दळवी (वय ४५) आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की पिता-पुत्राचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
अपघातानंतर अंजुम पटेल (नेवासा शहर काँग्रेस अध्यक्ष), संजय वाघमारे, वाहतूक पोलिस सुनील पालवे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पटेल यांनी यापूर्वीही रस्त्यावरील समस्यांवर उपाययोजनांसाठी निवेदन दिले होते. पटेल यांनी नमूद केले की, अहिल्यादेवी चौक ते शेवगाव चौक दरम्यान जागतिक बँकेने तयार केलेले एक फूट उंचीचे डिव्हायडर हे अनेक अपघातांना कारणीभूत ठरले आहे. रात्रीच्या अंधारात हा डिव्हायडर स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. त्यांनी यापूर्वीही हा डिव्हायडर हटवण्याची मागणी केली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पटेल यांनी या भागात कडक वाहतूक नियम लागू करणे आणि रस्ता सुरक्षेसाठी सुधारित उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.स्थानिक प्रशासनाकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.