Friday, May 3, 2024
Homeनाशिकअपघात रोखणे सर्वांची जबाबदारी : खा. गोडसे

अपघात रोखणे सर्वांची जबाबदारी : खा. गोडसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रस्त्यांवर होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी होणे शक्य आहे. त्याअनुषंगाने रस्ते अपघात रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खा. तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हेमंत गोडसे यांनी केले.

- Advertisement -

भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या डॉ. बा. शि. मुंजे सभागृहात ‘रोड सेफ्टी अँड बेस्ट प्रॅक्टिसेस इन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट’ या विषयावरील नवव्या आयोजित परिषदेत ते बोलत होते. या परिषदेस राज्याचे परिवहन विभाग आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, परिवहन उप आयुक्त भरत कळसकर, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष अशपाक अहमद, कार्यकारी अधिकारी संघटनचे अध्यक्ष परीक्षित पाटील, ऑल इंडिया फेडरेशनचे सचिव वासुदेव भगत यांच्यासह देशातील 15 राज्यातील परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शंभरहून अधिक मोटर वाहन विभागाचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल कंपनीचे प्रतिनिधी परिवहन क्षेत्राशी निगडित एनजीओ उपस्थित होते.

गोडसे म्हणाले, नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना देतांना त्यासाठी आवश्यक असलेली चाचणी अधिक प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी वाहनांची तपासणी ही काटेकोरपणे करावी. तसेच रस्त्यावर लावण्यात आलेले वाहतूक चिन्हांकीत सूचना फलक, रोड इंजिनिअरिंग व ब्लॅक स्पॉटमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यावर अधिकार्‍यांनी भर द्यावा.

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार म्हणाले, रस्ता सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करताना उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावीपणे वापर केल्यास अपघाताच्या संख्येमध्ये गुणात्मक घट होण्यास मदत होईल. प्रभावी रस्ता सुरक्षा अंमलबजावणी, वाहतूक नियमांची जनजागृती व प्रबोधनाच्या माध्यमातून निश्चितच अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असा विश्वास आयुक्त भीमनवार यांनी यावेळी व्यक्त केला.

परिषदेत सहभागी झालेल्या 15 राज्यांच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या राज्य संस्कृतीनुसार मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या स्मरणिका मिशन सेफ्टी व रस्ता सुरक्षाबाबत माहिती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दुचाकी वाहनधारकांना यावेळी हेल्मेटचे वाटप परिवहन विभागामार्फत करण्यात आले. प्रस्तावना कार्यकारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष परीक्षीत पाटील यांनी केली तर आभार ऑल इंडिया फेडरेशन अध्यक्ष अशपाक अहमद यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या