Sunday, September 8, 2024
Homeक्राईमदुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपींना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी

दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपींना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी

भुसावळ | प्रतिनिधी

- Advertisement -

येथील संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खुनातील अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना रात्री अकरा वाजता न्यायालयात सादर करण्यात आले असून तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, दि.२९ मे २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास येथील जुना सातारा परिसरात मरिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. या या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया यांच्यासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील विनोद चावरिया आणि राजू सुर्यवंशी यांना गुरुवारी पोलिसांनी गजाआड केले होते.

तर, या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांच्या पथकाने नाशिकमधील द्वारका परिसरात त्याला शिताफीने अटक केली. यानंतर करण पथरोड याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सुर्यवंशी व विनोद चावरिया यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे मानले जात होते. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव असे झाले नाही. दिवसभर भुसावळ न्यायालयाच्या बाजूला गर्दी जमली होती. मात्र आरोपी न्यायालयातच आणले गेले नाहीत. पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्तात राजू भागवत सुर्यवंशी, करण पथरोड आणि विनोद चावरिया या तिघांना रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन स्वतंत्र वाहनांमधून भुसावळ रेल्वे न्यायालयात आणले. तेथे दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला. यानंतर न्यायाधिशांनी तिघांना सात दिवसांची अर्थात ६ जून २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयीन कामकाजात या दुहेरी हत्याकांडातील दुसरे पैलू देखील समोर आले आहेत. यात प्रामुख्याने संतोष बारसे यांच्या बंधूंनी फिर्याद देतांना पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या वादाचा उल्लेख केला असला तरी न्यायालयीन युक्तीवादात एका हॉस्पीटलमधील सफाईच्या ठेक्याचा देखील संदर्भ आल्याची बाब लक्षणीय आहे. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणातील अन्य आरोपींचा माग काढण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. तसेच, शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम राखण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या