Tuesday, May 7, 2024
Homeनगरउसणवारीच्या पैशातून मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपीला जन्मठेप

उसणवारीच्या पैशातून मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपीला जन्मठेप

अहमदनगर|Ahmedagar

खूनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या एकाला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय 30 रा. सावेडी, मुळ रा. तेलकुडगाव ता. नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांनी हा निकाल दिला. 20 जून 2019 रोजी आरोपी गायकवाड याने त्याचा मित्र योगेश बाळासाहेब इथापे (रा. नगर) यांचा खून केला होता.

- Advertisement -

नगर-मनमाड रोड मयत योगेशचे वडिल बाळासाहेब अंबादास इथापे यांची चहाची टपरी असून तेथे शेजारीच पद्मावती पेट्रोलपंपावर कृष्णा गायकवाड याचे पंक्चरचे दुकान आहे. कृष्णा व योगेश यांची मैत्री होती. या मैत्रीमुळे योगेश याने कृष्णाला घरबांधणीसाठी एक लाख रूपये हातउसणे दिले होते. योगेशने कृष्णाकडे या पैशाची मागणी केल्यास तो जीवे ठार मारण्याची धमकी देत होता.

20 जून 2019 रोजी रात्री बाळासाहेब व त्यांचा मुलगा योगेश चहाच्या टपरीवर काम करत होते. त्यावेळी योगेशनने कृष्णाचे पंक्चर दुकान उघडे आहे, मला पैशाची गरज आहे, असे बाळासाहेब यांना सांगितले व तो कृष्णाकडे गेला. कृष्णा व योगेश यांच्यात भांडण होईल याची शंका बाळासाहेब यांना आल्याने ते योगेशच्या पाठीमागे गेले. त्यावेळी कृष्णा हातातील टॉमीने योगेशला मारहाण करत होता. बाळासाहेब यांनी कृष्णाला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ढकलून दिले व योगेशवर कोयत्याने वार केले. मारहाणीनंतर कृष्णा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी योगेश याला उपचारासाठी नगर शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. योगेशवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत योगेशचे वडिल बाळासाहेब इथापे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा गायकवाड विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरूवातीला पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील व त्यानंतर पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदरच्या गुन्ह्यात सरकारी पक्षाकडून आठ साक्षीदार तपासले गेले. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे व सरकारी वकिल सतिष पाटील यांचा युक्तवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कृष्णा गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. बी. बांदल यांनी मदत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या