Friday, June 14, 2024
Homeअग्रलेखउपक्रमशील मूल्यशिक्षण

उपक्रमशील मूल्यशिक्षण

शालेय वयात मुले अपरिपकव मानली जातात. त्यांनी माणूस म्हणून घडावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारावा या उद्देशाने याच वयात मूल्ये रुजवणे गरजेचे मानले जाते. कदाचित म्हणूनच शाळेत मूल्यशिक्षणाचा तास सुरु झाला असावा. तथापि मूल्ये पाठ्यपुस्तकाच्या धड्यापुरते मर्यादित राहू नये यासाठी मूल्यशिक्षण उपक्रमशील असावे असा आग्रह अनेक सर्जनशील शिक्षक पण धरतात.

- Advertisement -

अनेक जण त्यांच्या शाळेत तसे प्रयोग देखील राबवतांना आढळतात. नीटनेटकेपणा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता, संवेदनशीलता आणि करुणा अशी अनेक मूल्ये रुजवायला हवीतच तथापि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची अनुभूती विद्यार्थ्यांना दिली गेली तर ती कायमची रुजण्याची शक्यता कैकपटींनी वाढू शकते. समाजात मूल्यांचा अभाव आढळतो अशी तक्रार नेहमीच केली जाते. पण त्याहीपुढे जाऊन त्यासाठी स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला जायला हवा. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट बंधन’ उपक्रम राबवला जातो. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये करुणा भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. करुणेचा अर्थ फक्त दुसऱ्याचे दुःख-वेदना समजावून घेणे नव्हे तर त्यात सहभागी होऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करणे होय.

प्रोजेक्ट बंधन अंतर्गत गेली दहा वर्षे एमबीएचे विद्यार्थी मेळघाटमधील आदिवासींना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या राख्या, शोभेच्या वस्तूंची हे विद्यार्थी शहरात विक्री करतात. त्यातून आत्तापर्यंत आदिवासींना सुमारे पंचवीस लाखांपेक्षा जास्त आर्थिक मदत केली गेली आहे. त्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. निरुपमा देशपांडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जाते. मूल्यशिक्षणाच्या रुजवणीचे अनेक अभिनव प्रयोग करोना काळात समाजाच्या अनुभवास आले. भलेही त्यातील अनेक प्रयोग शालेय शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवणारे किंवा त्यांचे शिकणे सुरु ठेवणारे होते. तथापि पारंपरिक अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो, पठडीबद्ध शिक्षणाकडे नव्यापद्धतीने शिकवले जाऊ शकते हे समाजाच्या अनुभवास आले. विद्यार्थ्यांनीही त्यातून प्रेरणा घेतली. विद्यार्थ्यांमध्ये जीजी मूल्ये रुजवयाला हवीत अशी समाजाची अपेक्षा असते त्यासाठी असे अभिनव प्रयोग सातत्याने राबवले जाण्याची गरज आहे. पाणी जपून का वापरायचे? ओला आणि सुका कचरा का वेगवेगळा करायचा? नदीपात्रात काहीच का फेकायचे नाही? शब्दसंग्रह कसा वाढवायचा? वक्तशीरपणा का गरजेचा? वाचनसंस्कृती का रुजवायची? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. त्यांची उत्तरे उपक्रमातून दिली जाऊ शकतात. स्वच्छता हे आयुष्यातील एक महत्वाचे मूल्य. त्याचे संस्कार याच वयात केले जायला हवेत. त्यासाठी आपण फेकलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते, हे मुलांना समजावून सांगण्यासाठी कचरा डेपोची सहल आयोजित करणे, वॉटर फिल्टरेशन प्लांट दाखवणे असे अनेक उपक्रम अनेक शाळा आयोजित करतात. वक्तशीरपणा हे असेच एक महत्वाचे मूल्य. अमिताभ बच्चन सर्वानाच आवडतात. ते त्यांच्या वक्तशीरपणासाठी देखील ओळखले जातात. त्यांची अनेक उदाहरणे देऊन आयुष्यातील वक्तशीरपणाचे महत्व सांगता येऊ शकेल. विद्यार्थ्यांना विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली गेली तर कदाचित असे अनेक उपक्रम आकाराला येऊ शकतील. प्रोजेक्ट बंधन सारखे उपक्रम त्याची वाट प्रशस्त करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या