शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांनी मंगळवारी सकाळी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार्या थामा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी दोघांनीही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना आयुष्मान खुराणाने म्हटले, सुमारे 17 वर्षांपूर्वी मी शिर्डीत आलो होतो. त्या वेळी साईबाबांचे पूर्ण समाधानकारक दर्शन झाले नव्हते. आज अखेर पुन्हा दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने मन अतिशय प्रसन्न झाले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने म्हटले, मी याआधी छावा चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांच्या दर्शनाला आली होते. आज पुन्हा दुसर्यांदा दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी चमत्कारासारखे आहे. दोघांनी प्रथम द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले आणि नंतर साईबाबांच्या समाधीसमोर काही काळ ध्यानमग्न होऊन प्रार्थना केली.
त्यानंतर त्यांनी गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेतले. या वेळी साईबाबा संस्थानचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, प्रशांत सुर्यवंशी उपस्थित होते. संस्थानतर्फे आयुष्मान आणि रश्मिकाला साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार्या थामा या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून साईबाबांच्या आशीर्वादानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




