मुंबई :
सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण चर्चेत असताना मनोज वाजपेयीसारख्या बावनकशी कलाकाराला कधीतरी पूर्वी आत्महत्या करावी वाटण हे धस्स करुन टाकणारं आहे. त्याचवेळी मनोजची चिकाटी, मेहनत या अभद्र विचारला दूर सारणारी सुद्धा आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी यानेही त्याच्या आयुष्याचा प्रवास सांगताना एकेकाळी माझ्या मनातही आत्महत्या करण्याचे विचार आले असल्याचं सांगितलं.
अभिनेता मनोज वाजपेयीची मुंबई का किंग कौन ?? भिकू म्हात्रे.. ही सत्यामधील भूमिका तुफान गाजली. तिथून मनोजने मागे वळून पाहिलं नाही. शूल, कौन, गँगज ऑफ वासेपुर, अलिगढ, अय्यारी असे एकापेक्षा एक सिनेमे करत मनोज वाजपेयीने आपलं बॉलिवूडचं स्थान पक्कं केलं. पण, हा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या नवव्या वर्षी या मुलानं ठरवलं होतं की बॉस.. अपने को एक्टर बनना है. तिथून १७ व्या वर्षी दिल्ली. बिहारमधून दिल्लीत आल्यावर राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD)च्या प्रवेश परीक्षेत तीनवेळा फेल झाल्यानंतर मनोजच्याही मनात आत्महत्येच्या विचाराने थैमान घातलं होतं.
तोडकं मोडकं इंग्रजी.. बिहारी हिंदी घेऊन एक आउटसायडर मुलगा अभिनय शिकायला आला. जिद्दीने इंग्रजी, हिंदी शिकला आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) मध्ये तीनवेळा रिजेक्ट झाला. पण त्याच्या मित्रांनी त्याला सावरलं. त्याला अजिबात एकट सोडलं नाही. पुढच्या कित्येक रात्री मित्र त्याच्यासोबत राहात होते. मनोजनेच ही गोष्ट ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या इन्स्टापेजवर शेअर केली. असे विचार येत असतानाच शेखर कपूरच्या बँडेट क्वीनमध्ये त्याला संधी मिळाली. त्यात त्याने आपलं काम चोख केलं. तरीही हा आऊटसायडर झगडत होता. मुंबईतल्या एका चाळीत पाच-पाच मित्र एकत्र राहात होते. त्याची सामान्य चेहरेपट्टी. सडपातळ शरीरयष्टी पाहून अनेकांनी त्याला वाटेला लावल्याचं तो सागतो.
एका ऑडिशनआधी आपले फोटो दिल्यानंतर एका साहाय्यक दिग्दर्शकाने ते फोटो फाडून टाकल्याचंही तो सांगतो. एक दोन नव्हे तर तीन तीन प्रोजेक्ट त्याच्या हातातून गेले. पण मनोज झगडत राहिला. आणि कामातून चमकत राहिला.
मग एक दिवस रॉ फेसच्या शोधात असलेल्या रामूला त्याचा भिकू म्हात्रे सापडला… और कश्ती चल पडी. सिनेमे मिळू लागले. त्याने आपलं घर खरेदी केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की भाई आता आपण इथे टिकू शकतो. तब्बल ६७ सिनेमे त्याच्या खात्यावर जमा आहेत.
आज मागे वळून बघताना तो म्हणतो, अडचणी किती आल्या हे फार महत्वाचं नाही. पण एका नऊ वर्षाच्या बिहारी मुलाचा विश्वास कसा सार्थ ठरला हे महत्वाचं. महत्वाचं.