दिल्ली | Delhi
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष वाढला असून इस्रायलने आता थेट युद्धाची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळपासून सुरू झालेला हा संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. दरम्यान, या संघर्षादरम्यान, मृतांचा आकडाही वाढला आहे. कालपर्यंत (शनिवार) ३०० जणांचा मृत्यू झाला होता. तर, आता हाच आकडा ४८० वर पोहोचला आहे.
या सगळ्यात कित्येक भारतीय नागरिक इस्राइलमध्ये अडकले असून, त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) हिचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. नुसरतसोबत शनिवारी दुपारपासून कोणताही संपर्क झालेला नाही. माध्यमांना माहिती देताना नुसरतच्या टीममधील सदस्याने सांगितलं की, नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती.
त्यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. ज्यावेळी संपर्क झाला तेव्हा ती एका तळघरात होती आणि सुरक्षित होती. त्यानंतर मात्र तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. आशा आहे सुरक्षित परतेल, असं तिच्या टीममधील सदस्याने म्हटलं आहे.
नुसरतचा ‘अकेली’ (Akeli) हा सिनेमा ऑगस्ट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातही इराकमधील युद्धात अडकलेल्या एका मुलीचा घरी परतण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला होता. या सिनेमात नुसरतच्या दर्जेदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. पण सिनेमातल्या कथेप्रमाणे आता नुसरत इस्त्राइलमध्ये झालेल्या युद्धात अडकली आहे. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.