अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लोकशाहीच्या उत्सवात जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून सोमवार (दि. 13) रोजी शिर्डी आणि नगर मतदारसंघात होणार्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. या दोनही मतदारसंघात मतदान प्रक्रिया नि:पक्ष व निर्भय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शिर्डीत 16 लाख 77 हजार 355 मतदार असून नगरमध्ये 19 लाख 81 हजार 866 मतदार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषदेचे जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते. नगर जिल्ह्यात 3 हजार 734 मतदान केंद्रांवर 13 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर, सुरक्षा व्यवस्था, उष्माघातापासून संरक्षणासाठी औषधे, बैठक व्यवस्था, सावलीसाठी मंडप
उभारणी, तसेच पाळणाघर आदी सुविधेंसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रावरील छतांवर गवताचे पाचट टाकण्यात येणार आहे. वादळी वार्याने हे पाचट उडून जावू नये. यासाठी बांधणी पक्की करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी-वारा व पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मतदान साहित्याबरोबर मेडिकल किट उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्ह्यात 36 लाख 59 हजार 201 मतदार आहेत. तर 2 हजार 36 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील 12 मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टींग पाहता येणार आहे. वेब कॉस्टींगच्या वेळी वीज गेल्यास त्याठिकाणी सोलर यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मतदानाआधी मॉक पोल
जिल्ह्यातील दोनही मतदारसंघासाठी सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम मशिनसह मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदानाच्या पहाटे उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केलेले आहे.
नगर शहरात 288 मतदान केंद्र
नगर शहरात लोकसभेचे 288 मतदान केंद्र असून 149 केंद्रांचे ऑनलाईन वेबकास्टिंग केले जाणार आहे. 1 हजार 555 अधिकारी-कर्मचारी राहणार आहेत. 1 हजार 256 पोलिस अधिकारी-कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती नगर-नेवासे उपविभागीय अधिकारी तथा नगर शहर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. लोकसभेच्या मागील निवडणुकीला ज्या मतदार केंद्रावर कमी मतदान झाले आहे. त्या भागातील मतदान वाढविण्यासाठी आदर्श मतदान केंद्र म्हणून उपक्रम राबविला जातो. तारकपूर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालय आणि आयकॉन स्कूल येथे आदर्श मतदान केंद्र म्हणून समावेश करण्यात आला. भिंगार उपनगरातील सरदार वल्लवभाई पटेल विद्यालयातील मतदान केंद्र हे दिव्यांग अधिकारी-कर्मचार्यांमार्फत संचलित केले जाणार आहे. फक्त महिला अधिकारी आणि कर्मचार्यांमार्फत चार मतदान केंद्र संचलित केले जाणार आहेत. महात्मा फुले प्राथमिक शाळा, सावेडी, आनंद विद्यालय, गुलमोहर रस्ता, सावेडी, श्रीनाथ पाऊलबुद्धे विद्यालय, सावेडी आणि रेणावीकर विद्यालय, सावेडी हे चार मतदान केंद्र हे महिलांमार्फत संचलित केले जाणार आहेत.
18 हजार कर्मचारी नियुक्त
शिर्डीतील मतदान केंद्रांसाठी 8 हजार 530 मतदान अधिकारी, कर्मचारी व 860 राखीव कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 50 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. तर नगरसाठी 2 हजार 26 मतदान केंद्रासाठी 8 हजार 104 मतदान अधिकारी, कर्मचारी व 896 राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सेक्टर अधिकार्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी क्षेत्रीय दंडाधिकारी दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.