अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शासनाने 1 जुलैपासून दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याचे आदेश दिले आहेत. काही संस्थांकडून मात्र शासन निर्णयानुसार दर दिला जात नाही. सर्वच दूध संकलन संस्थांनी 30 रुपये दर द्यावा. हा दर न देणार्या तसेच भेसळयुक्त दुध स्वीकारणार्या संस्थांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दुग्धविकास व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल, बुधवारी येथे दिला. दूध भेसळ करणार्या प्रकल्पांवर छापेसत्र सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाच्या पदाधिकार्यांची बैठक काल, बुधवारी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगर जिल्ह्यात देशात सर्वाधिक दूध उत्पादन होते. त्यामुळे जिल्ह्यातील दूध धंद्याला शिस्त लागली तर संपूर्ण राज्यात शिस्त लागेल. जिल्ह्यातील दूध भेसळयुक्त झाले आहे ते भेसळमुक्त व्हायला हवे. स्पर्धेमुळे एका संकलन केंद्राने दूध नाकारले की ते दूध लगेच दुसरे केंद्र घेते. राज्य सरकारने आता भाव देण्यास सुरूवात केल्यानंतर तरी चांगल्या गुणवत्तेचे दूध संकलन झाले पाहिजे.
दूध भेसळ करणार्यांवर कारवाई करण्यासाठी दक्षिण व उत्तर भागातील अतिरिक्त जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र भरारी पथके कार्यरत राहतील. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, वजन मापे विभाग यांचा समावेश असेल. या पथकाने दूध संस्थांवर अचानक छापे टाकून तपासणी करावी, असेही आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यात 1 लाख 78 हजार शेतकर्यांना 5 रूपयांच्या अनुदानाप्रमाणे 98 कोटी रूपयांचा लाभ मिळाल्याची माहितीही मंत्री विखे यांनी दिली. जिल्ह्यात सुरू असलेले दुधाचे आंदोलन हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहेत. आंदोलने केवळ नगर जिल्ह्यातच होत आहेत, बाहेर जिल्ह्यात आंदोलन सुरू नाहीत, अशी टीका मंत्री विखे यांनी केली.
‘सुरत-चेन्नई’ भूसंपादन प्रश्नी मंत्री गडकरींची भेट घेणार
जिल्ह्यातून जाणार्या ‘सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे’च्या भूसंपादनाबाबत शेतकर्यांच्या विविध तक्रारी आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्री विखे यांनी काल, बुधवारी शेतकर्यांच्या बैठकीत दिले. ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे’ साठी नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहता, राहुरी, नगर व जामखेड तालुक्यातील एकुण 1300 हेक्टर जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भूसंपादनाबद्दल शेतकर्यांच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून बाधित शेतकर्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने भूसंपादनाचे चारपट दर जाहीर केले. त्यानुसार संगमनेरमध्ये 11 लाख रूपये, राहता 27 लाख 14 हजार, राहुरीत 27 लाख 25 हजार तर नगर तालुक्यात 50 लाख 50 हजार रूपये एकरी दर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. इतर तालुक्यांपेक्षा नगर तालुक्यात दर जास्त अधिक देण्याचे कारण काय, बाजारमूल्यापेक्षा दर खूपच कमी आहेत, अशा हरकती शेतकर्यांनी घेतल्या.